नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Thursday 28 December 2017

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस शानदार प्रारंभ कर्जतकर अनुभवणार कबड्डीचा थरार

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस कर्जत येथे आज शानदार प्रारंभ झाला. सहभागी खेळाडूंचे शिस्तबद्ध संचलन, भान हरपायला लावणारे नायगावच्या ढोलपथकांचे ढोलवादन आणि कर्जतकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात या स्पर्धेस प्रारंभ झाला. राज्याच्या विविध भागातून आलेल्या पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी 16 संघांचे साडेतीनशेहून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून त्यांचा खेळ पाहण्याची उत्सुकता कर्जतकर आणि जिल्हावासियांमध्ये आहे. पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी या स्पर्धेसाठीचे ध्वजारोहण करुन आणि ज्योत प्रज्वलीत करुन शानदार उद्घाटन केले. यावेळी आकाशात रंगीबेरंगी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.

कर्जतकरांमध्ये या स्पर्धेविषयी प्रचंड उत्सुकता असल्याचे चित्र संचलनावेळी पाहायला मिळाले. फुलांनी सजवलेल्या उघड्या जीपमध्ये पालकमंत्री प्रा.शिंदे विराजमान झाले होते. त्यानंतर शहराचे प्रथम नागरिक नामदेव राऊत आणि इतर मान्यवर सजवलेल्या ट्रॉलीमध्ये सहभागी झाले. सुरुवातीला विविध वेशभूषेत असलेली शालेय मुले, त्यानंतर महिलांचे ढोल-ताशा पथकाने वेधून घेतलेले लक्ष, लेझीम पथकांच्या तालावर कर्जतकरांनी धरलेला ताल आणि एकापाठोपाठ एक महिला आणि पुरुषांच्या संघांच्या आगमनावेळी टाळ्यांच्या कडकडाटात झालेले स्वागत याने सारेच वातावरण कबड्डीमय होऊन गेले. त्यातच पोलिसांच्या बॅन्डने वातावरणात नवा जोष संचारला.

शहराच्या विविध भागातून हे संचलन होत असताना शहरवासियांनी उत्स्फूर्तपणे नोंदवलेला सहभाग हे या संचलनाचे वैशिष्ट्य ठरले.

श्री सद्गुरु गोदड महाराज क्रीडानगरी अक्षरश: क्रीडाप्रेमींनी फुलून गेली. सायंकाळी प्रकाश झोतात सामने होणार असले तरी दुपारपासूनच क्रीडाप्रेमींची पावले स्पर्धास्थळाकडे वळत होती. संपूर्ण प्रेक्षक गॅलरी खचाखच भरली होती. शालेय मुलांपासून ते युवा वर्ग आणि महिलांचा लक्षणीय सहभाग जाणवत होता. अतिशय उल्हासपूर्ण वातावरणात या खऱ्या अर्थाने क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली.

आमदार भीमराव धोंडे, जिल्हाधिकारी अभय महाजन, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, नगराध्यक्ष नामदेव राऊत, सभापती पुष्पाताई शेळके, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी दत्ताभाऊ पाथ्रीकर, संभाजीराव पाटील, बाबूराव चांदेरे, पुंडलीक शेजवळ, सुनील जाधव, राजेंद्र फाळके, शांताराम जाधव, मोहन भावसार, विजय पाथ्रीकर, रमेश भेंडगिरी, भारत गाढवे, क्रीडा उपसंचालक विजय संतान, आस्वाद पाटील, उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, राजेंद्र फाळके, शिवछत्रपती क्रीडा प्रतिष्ठानचे सुभाष तनपुरे, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, प्रसाद ढोकरीकर, अशोक खेडकर, क्रीडा अधिकारी श्री. खुरंगे, यांच्यासह विविध मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

पालकमंत्री प्रा.शिंदे म्हणाले, आज खऱ्या अर्थाने ही अभिमानाची गोष्ट आहे. हा कबड्डी सोहळा कर्जत आणि जिल्हा क्रीडा विकासाला वेग देईल. युवा खेळाडूंसाठी ही प्रोत्साहन देणारी स्पर्धा ठरेल. हा तालुका कबड्डी प्रेमी हे जमलेल्या क्रीडा रसिकांनी दाखवून दिले असल्याचे सांगून प्रत्येक खेळाडू आणि संघांचे अतिथी देवो भव: पद्धतीने केले जाईल, असे ते म्हणाले. शासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांबरोबरच लोकप्रतिनिधी म्हणून दोन्ही गटातील प्रथम क्रमांकासाठी एक लाख एक रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 51 हजार रुपये देण्याची घोषणा पालकमंत्री प्रा.शिंदे यांनी केली. आगामी कालावधीत कर्जत तालुक्याचा खेळाडू राज्याचे आणि देशाचे नेतृत्व करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आमदार धोंडे म्हणाले, खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील खेळाडूंना या स्पर्धा प्रोत्साहित करतील.

नगराध्यक्ष राऊत यांनी कर्जतकरांनी खेळाडूंच्या स्वागतासाठी कोणतीही कसर सोडली नसल्याचे सांगितले. ही स्पर्धा संयोजनाच्या दृष्‍टीने सर्वोत्तम ठरेल, या भूमिला क्रीडापटुंचा वारसा आहे, त्यामुळे क्रीडामय वातावरणात ही स्पर्धा चांगली पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला.

जिल्हाधिकारी श्री. महाजन यांनी, सर्वांच्या सहकार्यातून ही स्पर्धा होत असल्याचे सांगितले. सर्वांनी या स्पर्धेचा लाभ घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले.

यावेळी प्रो कबड्डी स्पर्धेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सलग पाच दिवस क्रीडारसिकांना या स्पर्धांचा आनंद घेता येणार आहे. महिला आणि पुरुषांच्या संघात असणाऱ्या विविध नामवंत खेळाडूंच्या सहभागामुळे या स्पर्धेतील रंगत खऱ्या अर्थाने वाढली आहे. राज्य शासनाचा क्रीडा व युवक कल्याण विभाग, राज्य कबड्डी असोसिएशन, शिवछत्रपती क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

source:महान्यूज

No comments:

Post a Comment