नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Thursday 28 December 2017

विमानसेवेमुळे जळगावच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार - पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

जळगाव : मुंबई-जळगाव-मुंबई विमानसेवेमुळे जळगावचा औद्योगिक विकास झपाट्याने होणार असून मेडिकल हबलाही याचा फायदा होणार असल्याने ही विमानसेवा जळगावच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारी ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले.

उडान (उडे देश का आम नागरिक) कार्यक्रमातंर्गत मुंबई-जळगाव-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ येथील विमानतळावर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वलाताई पाटील, महापौर ललित कोल्हे, खासदार ए. टी. नाना पाटील, आमदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकरी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या उडान कार्यक्रमामुळे आज जळगाव ते मुंबई ही सर्वसामान्य माणसाला परवडणारी व वेळेची बचत होणारी विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. या विमानसेवेमुळे जळगावकरांचे गेल्या 43 वर्षांचे विमानसेवेचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. उडान कार्यक्रमात राज्यातील दहा शहरांची निवड करण्यात आली आहे. यापैकी आज जळगाव येथून विमानसेवा सुरु होत आहे, हा सर्व जळगाववासियांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. उडाण कार्यक्रमातंर्गत सुरु झालेल्या ही विमानसेवा सामान्यांना परवडली पाहिजे याकरिता याचे निम्मे भाडे हे राज्य व केंद्र शासन विमान कंपनीला देणार आहे. या विमानसेवेमुळे जळगावहून मुंबईला जाण्यासाठी व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांना लागणारा वेळ वाचणार आहे. तसेच उद्योग वाढण्यास मदत होणार असल्याने रोजगार उपलब्ध होऊन बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. एकंदरीत या विमानसेवेमुळे जळगावचा सर्वांगीण विकास होणार आहे.

यावेळी बोलतांना डेक्कन कंपनीचे प्रतिनिधी कॅप्टन जी. आर. गोपीनाथ म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे की, हवाई चप्पल घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवाई प्रवास (विमानप्रवास) करता आला पाहिजे. यासाठी सर्वसमान्यांना विमानप्रवास परवडला पाहिजे म्हणून त्यांनी उडान कार्यक्रम जाहिर केला आहे. या कार्यक्रमातंर्गत राज्यातील दहा शहरांची निवड झाली असून डेक्कन कंपनी जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरु करीत आहे. जळगाव शहरात डेक्कन कंपनीची विमानसेवा सुरु करण्याबाबत बोलतांना ते म्हणाले की, वीस वर्षापूर्वी मी जळगावला आलो होतो त्यावेळी उद्योजक भवरीलाल जैन यांनी मला जळगाववरुन विमानसेवा सुरु करण्याबाबत सुचविले होते. परंतु त्यावेळी येथील परिस्थिती विमानसेवा सुरु करण्यासाठी अनुकुल नव्हती. परंतु आता विमानसेवा सुरु झाल्याने त्यांचे स्वप्न मी पूर्ण करीत आहेत याचा मला आनंद होत आहे. तसेच एक रुपयांत विमान प्रवासाचे बुकींग करणाऱ्या प्रवाशांपैकी लकी ड्रा काढण्यात येणार असून आठवड्यातून एकदा त्यातील तीन लकी प्रवाशांना एक रुपयात विमानप्रवास करता येणार असल्याचेही कॅप्टन गोपीनाथ यांनी सांगितले.

या विमानसेवेतील निम्मे तिकिट उडाण कार्यक्रमातंर्गत आहे तर उर्वरित तिकिटे हे नॉन उडाण कार्यक्रमातंर्गत आहे. ही विमानसेवा विमान कंपनीलाही परवडली पाहिजे यासाठी जैन उद्योग समुहाने या विमान सेवेतील नॉन उडाण कार्यक्रमातंर्गतची पुढील सहा महिन्याची 25 टक्के तिकिटे आगावू घेतली आहे. यापोटी होणाऱ्या खर्चापैकी 7 लाख रुपयांचा धनादेश आजच जैन उद्योग समुहाचे अतुल जैन यांनी डेक्कन कंपनीचे कॅप्टन गोपीनाथ यांना सुपूर्द केला.

या विमानसेवेचा शुभारंभानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील, डेक्कनचे कॅप्टन गोपीनाथ व इतर हे मुंबईहून जळगाव येथे आल्यानंतर त्यांचे औक्षण करुन ढोलताश्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्यासोबत आलेल्यांना पेढे व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच जळगावहून मुंबईला जाणाऱ्या विमानातही पालकमंत्र्यांसह इतर मान्यवर मुंबईला गेले. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या विमानाला हिरवी झेंडी दाखविली.

मुंबई-जळगाव-मुंबई विमानसेवा आज सुरु होणार असल्याने जळगाव विमानतळ फुलांनी सजविण्यात आले होते. विमानतळावर सर्वत्र फुलांचे हार व फुगे लावण्यात आले होते. तसेच परिसरात रांगोळी काढण्यात आली होती.

मुंबई-जळगाव-मुंबई विमानातून प्रवास करणारे प्रवासी - चंद्रकांत पाटील, कॅप्टन जी. आर. गोपीनाथ, हिमांशू शाह, शैशव शाह, कॅप्टन संतोष पानी, जी. के. अनंथरामन, स्नेहा जॉय, कॅप्टन अतुल चंद्रा, अजय अवटने, शाह इम्रान अहमद, सतीष सुधीर नांदगावकर, मनिष विचारे, अमन सय्यद, मनोज राय, विवेक सिंघ, महेंद्र प्रभाकर अट्याळे, यलप्पा गाडीयडवार आदी होते.

source:महान्यूज

No comments:

Post a Comment