आई
कुणीच नाही माझे
..आईकरूणेचे तळहात पोरके ..आई
आकांत श्वासांत , शांतता कुजबुज टाळे माझे ..आई
ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे ..आई
असे जवळ - तसे दूर भाबडे अंतराळ माझे ..आई
कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई
असेल - आहे - असणार, कुणी शब्द गाळले माझे ..आई
अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे ..आई
अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे ..आई
कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई
एका आईची अंतयात्रा
आता सर्व काही आठवेल तुलाअगदी सर्व सर्व..
कदाचित रडशीलही
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..
तूला जन्म दिला होता
याची परतफेड करशील..
मान खाली घालशील
शरमेने..
खांद्यावर घेशील तेव्हा
तहान शमेल मस्तकातली..
किणार्यावर पोहोचवशील
पाचव्या ईसमाच्या मदतीने..
हे करतांना क्षणभर का होईनात
पण..
आठवेल का रे तुला
माझा खांदा..?
घामांच्या धारांतून वाहणारा माझाच अंश
तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेल
नकळत..
तेव्हा तरी संवेदनांची जाणीव होईल का रे
तुला..?
सर्व काही रितसर पार पाडशील
उघडा-नागडा माझा देह, उकळून घेशील भाजण्याआधी..
जाळशील आणि जळशील
देखावा सजवशील, अखेरचा..
माझा आणि तुझाही
माझा आणि तुझाही
- तुझी प्रेमस्वरुप आई
माझं दैवत घरात
माझ्याच घरात,
आयुष्यभरासाठी
'आशीर्वाद' देण्यास.
माझ्या मना
काहीच कळेना,
विसर मनाला
लागलो वारीला.
वारी-वारी करून
झालो मी बारीक,
खर्चुनी घरचं धन
लागली मनास सल.
सुखाच्या मी शोधात
कपाळी बुक्का लावत
माझं दैवत घरात
मी निघालो वारीत.
देहू-आळंदी झाले
पंढरी झाली-काशीलाही गेलो
मिसळलो मी वारीत
गुलाल खोबरे उधळत.
उशिराने कळुनी
चुकले मनास
'वैभवाचं मंदिर'
त्यावर कळस.
'तुळशीसम' प्रसन्न
सगळीकडं सहभाग,
सुखदुखात सोबत
"मना हिरवं रोपटं".
आली दाटुनी
नयनी आसवे,
मन माझे
पोरके झाले.
होतं घरीच दैवत
मी निघत वारीत,
मी निघत वारीत
माझं दैवत घरात.
फिरी येता परतुनी
उडे पाखरू सांजेला
मन धावे तुझ्याकडे
कुशी घे ग लेकराला
ढोरं कष्ट उपसुन
जीव थकला भागला
न्हाऊ माखु घाल मज
डोळे आले हे निजेला
मागे लागुन सुखाच्या
जरी गाव मी सोडला
क्षणभर ना मला
तुझा विसर पडला
व्याकुळला जीव माझा
आई तुझ्या ग भेटीला
आठवाने तुझ्या आज
गळा माझा ग दाटला
घाम गाळुन बहुत
जरी पैका हा साठला
कागदाच्या तुकड्याने
लेक आईला मुकला
वाटे सगळे सोडुन
गाव आपला गाठावा
सेवा करताना तुझी
देह मातीत मिळावा
दिस सुखाचे दावण्या
लेक परतून आला
पुरे झाले ते राबणे
थोडा घे आता विसावा
थोडा घे आता विसावा
No comments:
Post a Comment