नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Thursday 6 December 2018

Marathi Gazal

मन यॉडलं यॉडलं! (यॉडलिंगवर गझल)
लव्ह ट्रँगल
कुणाला भीत नाही मी कुणाचे खात नाही मी
पिंपळपान
पाहतो मी
नियम
गुंतला नाही कधीही जीव कोणातच
सोज्वळ मदिरा
तरी उरणार आहे शेवटी
राजकारण
म्हणोनी
दुर डोंगर
अंतर
सांगा कुठे हरवले?---(सेमिसरी गजल)
माझे तुझे पटले किती
तीच का माझी खरी
जरी हे तेवढ्या पुरतेच बोलू
माझा मुलगा
खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल
माराल काय तुम्ही तयांना
नशिबाच्या उपेक्षेला
जे जे पटेल तेव्हा!
शब्द... माझ्यासाठी
नटावे लागते आहे, सजावे लागते आहे
स्वप्न माझे एवढे डोळ्यात राहो..
भिजून चिंब गारव्यात शोधते कुणास तू..
कळली तर कळवा
चुलीमध्ये घाल
राग
अस्तित्व देवाचे
आशा
सत्कार !
तिला पाहण्याचा लळा लागला
शहाणे वागती रीतीप्रमाणे
स्मृति
रस्ता
हे तुझे माझे तराणे.....
कल्पना झाल्या शिळ्या, प्रतिमा पुराण्या
पाहून घे महात्म्या
वैश्विक खाज नाही
बोलण्यापुरतेच होते बोलण्याचे
ताळा....
नाटक वाटू नये
राजकारण
काय मी असलो तरी अन काय मी नसलो तरी
मोजतांना
चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला
अवतरणात "त्याचे" नसणे अधोरेखित होत गेले
नि:शब्द हो, कविते
सुरू झाली जुनी ती वेदना हृदयात घावाची
लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
कोण स्वत:चा असतो? सारे गुलाम संबंधांचे
मनाप्रमाणे कधी तरी मी जगू नये का?
कोळिष्टके
माझ्या लक्षातच नाही
रोजचे झाले
तरही गझल
मरणे माझे निश्चित होते
अबोल
सुखाचा केवढा झाला पसारा
...चुकले असावे
एकदा
जळणार आहे
झुकती नजर
मढे मोजण्याला
वनवास खास झाला
दुःख माझे
वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये
फकीर
अस्थी कृषीवलांच्या
मी ऐकले
आठवाया लागले विसरून जाणे
व्यसनाधीन..!
एवढे नसते जलद आयुष्य सरण्यासारखे!
दुष्काळ, भूक, तृष्णा....प्रश्नावलीप्रमाणे!
मी कापसाप्रमाणे झालो सुमार हल्ली!
पाहतात का मलाच....
पहा नाठाळ चालवती कशी लाठी, तुकारामा!
रणधुमाळी तीच अन्‌‍ त्याच आरोळ्या पुन्हा
पहा प्राण गेला पहाडाप्रमाणे........
अतीशाहणे अन् शहाणे किती?




मन यॉडलं यॉडलं! (यॉडलिंगवर गझल)

वेड इतकं जडलं, मन यॉडलं यॉडलं!
पार पार बिघडलं, मन यॉडलं यॉडलं!

स्वप्न मनात फुललं, मन स्वप्नात झुललं
स्वप्नरंजनी दडलं, मन यॉडलं यॉडलं!

माझं दुरून पाहणं, तुझं चोरून लाजणं
कसं कळेना घडलं, मन यॉडलं यॉडलं!

तुझं दिवसा टाळणं, माझं रात्रीचं झुरणं...
अंगवळणी पडलं, मन यॉडलं यॉडलं!

वाटे हवासा होकार; पण नकार स्वीकार!
नाही खेटर अडलं, मन यॉडलं यॉडलं!




लव्ह ट्रँगल

हिच्यासाठी झुरू की तिच्यासाठी उरू
कोणासाठी किती आणि काय काय करू

पिझ्झासाठी तिचा बाळहट्ट
पोळीभाजीशी हिची मैत्री घट्ट
आपलं काय, भाजीच टॉपिंग
पिझ्झासोबत खाऊ
कोणासाठी किती आणि काय काय करू

साडी घालताना तिचा चेहरा त्रस्त
हिची काळजी साडी परंपरेचा अस्त
आपलं काय, मोगऱ्याचा छान
सुगंध दोघींना माळू
कोणासाठी किती आणि काय काय करू

तीचं प्रेम, वारा सुसाट बेफाम
हीची माया, वृक्ष थकलेला स्तब्धखोल
आपल काय, कधी झाडाच गर्द हिरवं पान
कधी वाऱ्या बरोबर पाचोळा बनू
कोणासाठी किती आणि काय काय करू


कुणाला भीत नाही मी कुणाचे खात नाही मी
कुणाला भीत नाही मी कुणाचे खात नाही मी
स्वताचे गीत गुणगुणतो कुणाचे गात नाही मी

तुझ्या शहरात असशिल खूप मोठा राज्यकर्ता तू
जरा जाणून घे इतके तुझ्या राज्यात नाही मी

स्वतःला जॉब नसताना जिच्यावर खर्चला पैसा
अता मी भेटलो तर बोलली स्मरणात नाही मी

जरा दिसलोच कोठे तर नजर ती चोरते हल्ली
तिच्या लक्षात आहे की तिच्या लक्षात नाही मी

तहाच्या संपल्या आहेत उरल्या शक्यता साऱ्या
असे समजून घे आता तुझ्या भाग्यात नाही मी

गरीबांच्या घरी मी खात असतो कोरडी भाकर
तुझ्या त्या पंचपक्व्यानातल्या ताटात नाही मी


पिंपळपान
आधी क्षमेच्या कारणांची खाण शोधू
मग फुलांनी केलेला अपमान शोधू

दाखवा पदवी अगोदर वाल्मीकीची
अन्यथा रामायणात अज्ञान शोधू

सोसेना गलका सभोवती शांततेचा
दूर याहून एक स्थळ सुनसान शोधू

बोलण्या आधीच सुरू होती लढाया
ऐकूनी घेतील असले कान शोधू

प्रेमामध्ये जीवही टाकू ओवाळुन
भंगल्यावर नफा कि नुकसान शोधू

आदेश हा कारागृहे खुली करण्याचा
पळूच ना शकेल तो बंदिवान शोधू

शब्दांच्या कचऱ्यातही मोती एखादा
थेट मनाला भिडणारे लिखाण शोधू

जिवंत दुनिया जळते एकमेकांवर
मृतदेहांना जाळायाला स्मशान शोधू

शिव्या शाप जरी रोजचेच ठरलेले
नशिबातील एखादे समाधान शोधू

खंत नको कालची वा तमा उद्याची
खुल्या बाहूंनी जगू.. वर्तमान शोधू

रात्र बाकी ये पुन्हा हरवून जावू
पहाटे माझे तुझे देहभान शोधू

अटळ प्रलय आहे हा विशाल तर
अवघे विश्व तराया पिंपळपान शोधू




पाहतो मी
आरसा हा रोज आता तोडण्याला पाहतो मी !
साक्ष आताची खरी ही फोडण्याला पाहतो मी !
कोरलेल्या ह्या कपाळा सोसलेल्या मी नशीबा
'रूप माझ्या वेदनेचे ' खोडण्याला पाहतो मी !
हा दिलासाही नकोसा ना कुणाचाही भरोसा !
तोडलेल्या काळजाला जोडण्याला पाहतो मी !
जीव झोके घेत राह्या दोर कोणी बांधली ही
 वंचनेचे खेळणे या पाळण्याला पाहतो मी !
काल येथे वेढलेला झाकलेला घोळक्यांनी
 का मलाही एकटा मी सांगण्याला पाहतो मी !
साक्षखोटी चांदण्यांची चंद्रमाही डागलेला
 चांदण्याचा मांडवाला मोडण्याला पाहतो मी!
ह्या मनाशी आदळे ही लाटमोठी वादळांची
 भावना आता अशाही रोखण्याला पाहतो मी!



नियम
या धरेचे नियम सारे मोडले मी
का असे नाते नभाशी जोडले मी?

सोडुनी घरटी जुनी पक्षी उडाले
जीर्ण वृक्षाला तरी ना सोडले मी 

राहिला आता कुठे संदर्भ त्यांचा
धर्मग्रंथांतील दावे खोडले मी

कळत-नकळत मी कसा बोलून गेलो?
गुपित जपलेले चुकीने फोडले मी!

यायचा समजावण्यासाठी मला तो...
बोलणे त्याचे मधे का तोडले मी?




गुंतला नाही कधीही जीव कोणातच
गुंतला नाही कधीही जीव कोणातच
एवढा मी गुंतलो दररोज माझ्यातच
तू अहिंसेची कशाला ओढतो चादर
शान योध्याची खरी तर फक्त लढण्यातच
ही तुझी वृत्ती तुझी भाषा तुझी गाणी
ठेवली होती गझल तू खोल जगण्यातच
खूप फॉर्मल बोलणे होते तुझे माझे
गोडवा आला कुठे ना मूळ नात्यातच
आजची अपुली अवस्था वेगळी असती
ठेवले असतेस काही फक्त दोघातच.





सोज्वळ मदिरा
आधी खाते भाव जराशी
मग ती घेते नाव जराशी
तू नसण्याने भिकार झाले
बघून ये तू गाव जराशी

चाल रडी पण; लोभसवाणी
खेळ आणखी डाव जराशी

आढे वेढे हवे कशाला
थेटच दे ना ठाव जराशी

खुळ्या स्मृतींना जपण्यासाठी
निदान दे तू घाव जराशी

उत स्वप्नांचा पाडा आला
लगबग ये चल घाव जराशी

मम श्वासाची कपोलभाती
ओठावरती लाव जराशी

अभय नशेची सोज्वळ मदिरा
दे चढण्याला वाव जराशी




तरी उरणार आहे शेवटी
मान्य मी मरणार आहे शेवटी
पण तरी उरणार आहे शेवटी

हासतो पाहुन दुसऱ्याचे मरण
तो कुठे जगणार आहे शेवटी

वाचते आहे मला ती सारखी
मी तिला कळणार आहे शेवटी

तू गझल माझी जवळ वा दूर कर
शेर तर भिडणार आहे शेवटी

जो जसा आहे तसा तो वाटतो
काय मी फसणार आहे शेवटी





राजकारण
प्रत्येक माणसाच्या जगण्यात राजकारण
बहुतेक या हवेच्या रक्तात राजकारण

सुटली अनेक कोडी एका क्षणात माझी
वर्षे निघून गेली कळण्यात राजकारण

 मागेच राहिलो मी कायम तुझ्या जगाच्या
मी आणलेच नाही माझ्यात राजकारण

 नाते तुझे नि माझे शाबूत करून ठेवू
करतील ही उद्या ते अपुल्यात राजकारण

 पडते गरज तयांना माझी पदोपदी का
कुठ्ल्या गटात माझे असण्यात राजकारण

 येथे जगावयाला साधे सरळ असावे
इच्छे नुसार जगण्या हातात राजकारण




म्हणोनी
रुचलेच नाही मी बदललो म्हणोनी
ग तुझेच सारे मंगल व्हावे म्हणोनी

बघ वेळ वेगानेच गेली निघूनी
मी थांबलो येशील तूही म्हणोनी

श्वासास होते कोंडले मी जरासे
श्वासात तू असशील वेडे म्हणोनी

छातीत होते दुखत बघ काळजीने
हृदयासही तू रिक्त केले म्हणोनी

दृष्टीत कोठेच मी नव्हतो जगाच्या
ताऱ्यात मी वसतो सदैवच म्हणोनी



दुर डोंगर
दुर डोंगर पहाडी होती
वृत्तीतच धडाडी होती

नाते बाभळीचे तुटले
बोरीची चहाडी होती

लाजच वाटते नात्यांची
रक्तातच लबाडी होती

नाही शक्य ती ऊभारी
विझलेलीच काडी होती

लुटले गोरगरिबाला पण
नशिबी हातगाडी होती



अंतर
म्हणाले तेही दिवस तुझे तू मंतर
फुकाचा टेंभा नको, सर कर दिगंतर

जरा आता धावतोच मी वेगाने
तरी मी दोघातला दुवा निरंतर

नका रे अडवू मला, मला जाऊ दे
कुठे मी उरणार फारसा ह्यानंतर

बदललो माझ्या नकळत मीच अचानक
नसे कोणी पाहिलेच हे स्थित्यंतर

प्रिये मी कोणास हाक मारू आता
तुझ्यावर आहेच प्रेम मात्र निरंतर

डसाया आलेच आपल्याला संशय
अता नाही ऊरलेच रे गत्यंतर



सांगा कुठे हरवले?---(सेमिसरी गजल)
मंदीर मारुतीचे कोणी कुठे हलवले?
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?

तो पार मंदिराचा रात्री जमून सारे
सुख दु:ख सांगताना जाती रमून सारे
हुंकार वेदनांचे नव्हते कुणी लपवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
जागेत मम घराच्या झालाय मॉल आता
डीजेवरी डुलूनी धरतात ताल आता
येथे शुभं करोती होते मला शिकवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
विकतो पिझा दुकानी म्हणतात हट तयाला
गर्दी अमाप असते आळस घरी बयाला
आईत अन्नपूर्णा मजला तिने भरवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
तांदूळ हात सडीचा शिजवीत माय होती
साजूक तूप माया ओतीत माय होती
सारेच लाड माझे होते तिने पुरवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
शाळा इथे असावी तो काळ दूर नव्हता
गणवेष बूट कसले? शिकण्यात सूर होता
आदर्श पाठ येथे होते किती गिरवले?
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
झोतात पश्चीमेच्या का लोप संस्कृतीचा
दिसतोय काळ आला बेभान विकृतीचा
विझण्यास ज्योत आम्ही काहूर का पुरवले?
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?











माझे तुझे पटले किती
सांग ना माझे तुझे पटले किती
अन तुझ्यासाठीच मी झटले किती

मी न केलेल्या गुन्ह्याची ही सजा
रोजचे मोजायचे खटले किती

जी नको ती द्यायचा आभूषणे
रंगमंचावर तुझ्या नटले किती

हात मदतीचा दिला म्रुत्योस अन,
दाम आयुश्या तुझे घटले किती

गोष्ट लाखोंची जरी सांगायचा
चेक बँकेचे तसे वटले किती ??





तीच का माझी खरी
तीच का माझी खरी सुरुवात होती
भेटलेली अक्षरे शब्दात  होती

मी तिच्या दुःखास ही त्याचाच वाटे
कोणती जादू अशी माझ्यात होती

जीवना पंगत तुझी गम्मत असावी
जी नको ती गोष्ट ही ताटात  होती

फेल तू झाला तुला कळलेच नाही
उत्तरे दडली तिच्या प्रश्नात  होती





जरी हे तेवढ्या पुरतेच बोलू
जरी हे तेवढ्या पुरतेच बोलू
तुझा मी रहिलो इतकेच बोलू

तुला बघताच वाटे नेहमी की,
जगाला  टाळुनी नुसतेच बोलू

अश्या धुंदीत राहू बोलतांना
हवे ते सोडुनी भलतेच बोलू

कशाला वायफळ चर्चा नकोत्या
जरा बोलू, तुझे मझेच बोलू

नकोसा वाटतो आता अबोला
तुला जितके हवे तितकेच बोलू


माझा मुलगा
प्रणांपेक्षा मुलास माझ्या जपले होते
क्षण सोनेरी आनंदाचे टिपले होते

पुस्तक पुस्तक,पुस्तक पुस्तक,वाचन केवळ
वेड ही त्याचे काय मी सांगू कसले  होते!!!

ज्ञानाचा भांडार म्हणू , की काय म्हणू मी
माहित होते! सगळे काही कळले  होते.

नेतांना मग त्याला जेव्हा सरणावरती,
म्रूत्योचेही थोडे अश्रू ढळले  होते

आत्ता आत्ता बोलत होता, चालत होता,
क्षणात एका प्रेतही त्याचे जळले होते.

दिसतो आता माझा मुलगा मित्रांसोबत
तो गेल्यावर सगळे जेव्हा जमले  होते

कधी न दिसला दुःखी मजला माझा मुलगा
परिस्थितीवर म्हणून मीही हसले  होते






खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल
हसण्यात जन्म घ्यावा उरकून माणसाने
प्रज्ञा, कला, प्रितीवर भाळून माणसाने

दोन्ही मुठी रिकाम्या घेऊन जन्म-मृत्यू
तृप्तीसवे करावा हनिमून माणसाने

क्रोधिष्ट भावनाला देऊन सोडचिठ्ठी
शांतीसही बघावे बिलगून माणसाने

माया, तृषा, मनीषा नेईल आडमार्गा
लागू नयेच नादी उमजून माणसाने

करपाश घट्ट द्याया अथवा विलीन व्हाया
सुमतीस वश करावे रिझवून माणसाने

रति, काम, मोह, मत्सर वरचढ-अभय न व्हावे
मोक्षाकडे निघावे ठरवून माणसाने







माराल काय तुम्ही तयांना
माराल काय तुम्ही तयांना
हाती त्यांच्या समशेर आहे
हात तुमचे बांधलेले
क्षमा याचनेची आर्जव आहे

निः शब्द मौनता तुमची
कमाल आहे भ्याडपणाची
त्यांनी किती कुरापती काढल्या
परी षंढ तुमचा जागा आहे

लाज असे तुमची  तुम्हाला
सभ्यतेतही भीड भरली
काय तुम्ही कराल सामना
अशा जनांचा वा मनाचा





नशिबाच्या उपेक्षेला
नशीबाच्या उपेक्षेला प्रयत्नांची क्षमा आहे
 खुलासा पण हव्यासाचा अपेक्षेला हवा आहे
फरक आहे जरासा हा तिच्यावाचून असण्याचा
 गजल जामीन आहे वाद जगण्याची सजा आहे !
कुठेही सापडेना शोधता शोधून 'जिव्हाळा'
नकाशा हा जुना अन गांव आता हा नवा आहे !
मनाला आज समजवता पुन्हा परतून हा आला !
दुखाचा थेंब खारट पापण्यांनी चाखला आहे !
नव्याने रोजही ठरवू किती मीपण 'सुधरण्याचे' ?
 'सुधरल्याचा ' पुरावा हा मनासाठी बरा आहे !


जे जे पटेल तेव्हा!
नाही कुणास जनता मग आवरेल तेव्हा
ते साव चोर होते सारे कळेल तेव्हा
खोडू जुना नव्याने इतिहास एकदाचा
काही नवीन सांगू जे जे पटेल तेव्हा
आता कुणास नाही जर भरवसा कुणाचा
सारे लिहून घेवू मग परवडेल तेव्हा
आहे अशी खुमारी जग चेतवायची जर
होईल काय सांगा ठिणगी पडेल तेव्हा
अंबर उदास होवो कोणास काय त्याचे
इच्छेस मागतांना तारा तुटेल तेव्हा !
गेले पिळून असते ते हृदय सांग माझे
अत्तर असेल बाकी तर दरवळेल तेव्हा !







शब्द... माझ्यासाठी
होऊ नकोस तू उदास माझ्यासाठी
तू एकदा अजून हास माझ्यासाठी
मी राहतो इथे, तुझ्याच अवती-भवती
घडतो तुला तरी प्रवास माझ्यासाठी!

गजलः

फिरतात शब्द आसपास माझ्यासाठी
हसतात शब्द दिलखुलास माझ्यासाठी!

पत्रामधून ते दुरून येती येथे...
करतात शब्दही प्रवास माझ्यासाठी

वाहून आणती जुन्या स्मृतींचे ओझे
करतात शब्द हे कशास माझ्यासाठी?

होतात कोरडे, कठोर ते वरपांगी
जपतात शब्द पण मिठास माझ्यासाठी

मी खोल अंतरी उदास असतो तेव्हा
असतात शब्दही उदास माझ्यासाठी

होताच सांजवेळ ओसरीवर माझ्या
जमतात शब्दविहग खास माझ्यासाठी!





नटावे लागते आहे, सजावे लागते आहे
नटावे लागते आहे, सजावे लागते आहे
कराराच्याप्रमाणे देह व्हावे लागते आहे

कधी विधवा, कधी पत्नी बनावे लागते आहे 
सती जावे, सतीचे वाण घ्यावे लागते आहे

कधी होत्या जिथे ज्वाळा तिथे धग राहिली थोडी
उतू गेल्याविना आता निवावे लागते आहे

मृतांचा कोण हेवा वाटतो आम्हा जिवंतांना
तुम्ही सुटलात, आम्हाला जळावे लागते आहे

कळेना कावळ्यांवर, मृण्मयी, ही वेळ का आली  
स्त्रियांना आणि पिंडांना शिवावे लागते आहे






स्वप्न माझे एवढे डोळ्यात राहो..
स्वप्न जागे नेहमी डोळ्यात राहो..
मी व्यथेला कोण, ते लक्षात राहो

मी स्वत:च्या मारतो इच्छा हजारो
भाकरी कायम तुझ्या हिश्यात राहो

सर्व इतिहासात गुंजो नाव माझे
धार माझ्या एवढी शब्दात राहो

अमृताला ही असो माझी प्रतीक्षा
अन विषाचा दाह ही रक्तात राहो

सैन्य हे नारायणी मिळूदे तयांना
कृष्ण माझ्या नेहमी पक्षात राहो

शेर माझे तू कसेही वाच मित्रा
नाव माझे नेहमी मक्त्यात राहो



भिजून चिंब गारव्यात शोधते कुणास तू..
(फितूर पावसात या थरारते कशास तू)
भिजून चिंब गारव्यात शोधते कुणास तू

मुके मुकेच शब्द हे मुक्या मुक्याच भावना
अबोल का असे तुझ्या स्विकारते जगास तू?

फुलातल्या दवापरी मधूर मंद हासते
खळी तुझी बघून छान लाजते स्वःतास तू

जरी तुझ्या मनात मी कणात मी क्षणात मी
निघून दूर जायचाच ठेवते प्रयास तू

न टाळले व्यथेस तू न टाळले तिने तूला
हजार  वेदना  अश्याच मागते कशास तू





कळली तर कळवा
दुष्काळाच्या ज्वाळांमध्ये, जपून ठेव नर
गोठवलेल्या बर्फाखाली, अप्सरांचे घर

जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी सांग
तूच आपल्याच बिळावरती, झाकण नीट धर

यंदा मुद्दल मागू नकोस, फुकट केळी ने
कामात येईल कधी काळी, गरज पडली जर

भिडाच एकदा निग्रहाने, बाकी बघू मग
कोण लोळणार खाली आणि, कोण चढेल वर

स्मशानातल्या मसन्याउदास, कुठे काय वर्ज्य
मेल्यावरती मर नाहीतर, जिवंतपणी मर

किती उपडणार आहेस तू, बस इतके ठरव
रोज वाढणाऱ्या धस्कटास, 'अभय' असेल तर




चुलीमध्ये घाल
मेघ भरजरी आठवणींचे, दाटून आले काल
नयनामधे आली त्सुनामी, वाहून गेले गाल

जाता जाता हळू घातली भुवई उचलून साद
या चिमणीच्या चोचीसाठी दाणा घेऊन याल?

बोल बोबडे मर्दुमकीचे बोलून झाले फार
असेल जर का तुझ्यात हिंमत, हाती घे तू मशाल

कर्ज काढुनी कशास शेती कसतोस मित्रा सांग
येडपटांचा येडा धंदा कुत्रं खाईना हाल

साहित्याचा खेळ गारुडी तेजीत आला फार
पराजितांचे अश्रू विकुनी झालेत मालामाल

या मातीचा लोळ एकदा क्षितिजे भेदुनी मार
चिंब न्हाऊ दे दिगंताला रंग दे लालीलाल

'अभय' देईना पोशिंद्यास; वाचू कशाला सांग?
तुझे प्रबंध तुपात घोळून चुलीमध्ये तू घाल




राग
जेव्हा चिडतो मी माझ्यावर
रागवतो तेव्हाच तुझ्यावर
जेव्हा जेव्हा माझे चुकते
चूक मला  तुझियातच दिसते
ओरडतो ठोकर बसल्यावर
सावर ना आता तू लवकर
जेव्हा माझा सुटतो ताळ
तुलाच म्हणतो संयम पाळ
म्हणून करतो मी कांगावे:
माझे चुकले तूहि म्हणावे...





अस्तित्व देवाचे
आश्वस्त अता व्हावेच कोणा सांगत सृष्टि नाहीं !
जेवून भले गेले जरी पत्रावळ उष्टी नाही !!
तारे अन  पृथ्वी का  मला  सांगावच सक्ती नाहीं !
आता निजरूपे  दाव  विश्वात्म्या मज दृष्टि नाहीं !!
देवत्व कशाचे तेच आता सांगा जर हट्टी नाहीं
झाकाव गुपीते ऐवढी  लाखाची मज मुष्टि नाहीं !
आश्वासन दे तृष्णेस धरेच्याही तिज तृप्ती नाही
सारेजण ओवाळी तुला, खाली बघ वृष्टि नाहीं!
द्यावीत सुखे  तू सर्व सार्यांना क्षण मुक्ती काही
आस्तित्व तुझे  देवा न मानावे ह्या मग पुष्टि नाहीं !!




आशा
दूर आहे आज गंगा पाहून आलो
अर्ध्य माझे चंद्रभागे देवून आलो !
येत नाही आठवांना तो गंध आता
 काय मी हा श्वास तेथे ठेवून आलो ?
ओलते संदर्भ आभाळी वेदनेला
 दूर ओझे मी ढगांचे वाहून आलो !
थांबले आता धुमारे या माझ्या व्यथेचे
 धुमसतांना एकदा मी पेटून आलो !
थांबवावे गोंधळाला कंटाळलो मी
 आज एकांतास माझ्या विनवून आलो !!
वाहली श्रद्धांजली ती केव्हाच मनाला
 आज आशा कोणती मी लावून आलो !





सत्कार !
लोक पुसती कारणे, माझ्या कपाळी आठीचे,
उत्तरे नाही मिळाली, प्रश्न झाले साठीचे.

ह्या जगी मी हिंडताना, भिन्न स्नेही जोडले,
सभ्यतेला नाव आहे, आतल्या त्या गाठीचे.

सोयीने भांडून गेले, गोड ही ते बोलले,
काय होते आतले, अन काय होते ओठीचे ?

पावसाळे सोसुनी, उरलो जरी मी जाणता,
वार होते झोंबणारे, जाणिवेच्या काठीचे.

जाहला सत्कार माझा, खूप होते लोक ही,
शाल त्यांची झाकते का, घाव माझ्या पाठीचे ?





तिला पाहण्याचा लळा लागला
तिला पाहण्याचा लळा लागला
स्वत:हून मासा गळा लागला

नव्हाळीत नाहून शृंगारली
किती देखणा सापळा लागला

नको गर्व, राधे, उजळ कांतिचा
तुलाही निळासावळा लागला

मनाला मृदुल स्पर्श झाला तिचा
झरा प्रीतिचा कातळा लागला

उभय चेहर्यांवर प्रभा तृप्तिची
भुकेला तनय आचळा लागला

युगुलगीत आपण जरी छेडले
तुझा सूर का वेगळा लागला?

उसळती नदी मी, निमाले, मिलिंद
तुझा पाय यमुनाजळा लागला




शहाणे वागती रीतीप्रमाणे
शहाणे वागती रीतीप्रमाणे
जिणे आखीव भूमीतीप्रमाणे 

कटाक्षांचे जरी जाळे मुलायम  
चिवटता तांबड्या फीतीप्रमाणे 

लढाईचे नियम आधीच ठरवू
करू संसार रणनीतीप्रमाणे 

दुधाची भागवू ताकावरी, ये
तृषेला भोगही प्रीतीप्रमाणे

दिसो तृप्ती मुखावर पूर्ततेची 
असावी क्लांतता वीतीप्रमाणे

हवा ठेहराव कवितेला भिनाया   
भिडाया चाल खगगीतीप्रमाणे 





स्मृति
नभोदरात गर्जती अशांत मेघ सावळे
इथे मनात माझिया तुझ्या स्मृतींचि वादळे!

क्षणात मौक्तिके खुळी विसावली कळ्यांवरी
कसे जुळून येति हे ऋणानुबंध आगळे!

उनाड वात वाहता उरामधून मातिच्या
थरारत्या हवेतुनी तुझाच गंध दर्वळे!

उधाणत्या सरींतुनी तुझे सुहास्य सांडले
भिजून चिंब जाहले तृषीत श्वास कोवळे!

अजाण उर्मि अंतरी तुझाच स्पर्श चेतवी
अनाम आर्त भाव हा तुला कळे मला कळे!

तनामनात ही अशी जणू सतार वाजते
तशात रम्य धुंद हा अखंड मेघ कोसळे!





रस्ता
आठवणी जणू वदला  रस्ता
पाउलखुणांनी सजला रस्ता !
ओल्या मेंदित रडली स्वप्ने
खोटी प्रतिष्ठा अडला रस्ता!
वेचले खुपते  काटे जेव्हा
पायघड्याचांच  दिसला रस्ता !
दिसता अंधार दिव्याखालचा
चालतांनाही नडला रस्ता !
स्मृतिंचा फेरा येतो जातो
रहदारी अशी खचला रस्ता!




हे तुझे माझे तराणे.....
बघ जुने कुठले तराणे राहिले
हे तुझे माझेच  गाणे राहिले

भेटण्याला मी किती आतूर अन
रोजचे फसवे बहाणे राहिले

भिरभिराया लागले डोळयांपुढे
भास नजरेचे शहाणे राहिले

राहिलो वेडा तिचा आजन्म मी
स्वप्न ही माझे दिवाणे राहिले
                       
रोजचा तख्ता पलट झाला जगी
राहिले अपुलेच नाणे राहिले






कल्पना झाल्या शिळ्या, प्रतिमा पुराण्या
कल्पना झाल्या शिळ्या, प्रतिमा पुराण्या
झाडते आहे तरी कविता दुगाण्या

भेटतो तो आपल्या दु:खात असतो
ऐकवाव्या मी कुणाला रडकहाण्या

कूस केव्हा बदलली ह्या जीवनाने?
युगुलगीतांच्या कधी झाल्या विराण्या?

युद्धभूमी पाहुनी अवसान गळले
अन् तुतार्या कालच्या झाल्या पिपाण्या

हे किती शोकांतिकांचे मूळ असते
एक राजा आणि त्याच्या दोन राण्या






पाहून घे महात्म्या
पाहून घे महात्म्या, इथली शिवार राने
केला भकास भारत, शोषून इंडियाने

तुमचे विचार बापू, गाडून पूर्ण केला
तुमचा बघा पराभव, तुमच्याच वारसाने

चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या
जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने

संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले
भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने

आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने

वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने

इतुकेच शोध उत्तर, मातीत राबणार्या
बदलेल भाग्य निव्वळ, घाम गाळल्याने?

मुर्दाड शासकांना, सोयरसुतूक नाही
हकनाक तूच मरशील, गळफास घेतल्याने

शेती कसून दाखव, तू विद्याप्रचूर तज्ज्ञा
सुटणार प्रश्न नाही, बुद्धी उगाळण्याने

लक्ष्मीस आणखी मी, सांगा किती पुजावे?
नांदूच देत नाही, ही अवदसा सुखाने!

डोक्यास ताण दे तू , अन सोड आत्मग्लानी
काही तरी 'अभय' कर; मुक्ती मिळेल ज्याने







वैश्विक खाज नाही
शृंगारल्या मनाला, वैश्विक खाज नाही
भोगत्व सोडले तर, कसलाच माज नाही

निष्णात सैन्य माझे; पण हारणार नक्की
मोफत लढ़ावयाचा, यांना रिवाज नाही

त्यांच्या कपटनितीला, चिरडून टाकतो मी
धर्मास जागणारा, मी धर्मराज नाही

खाणार काय घंटा? सोने पितळ कि तांबे?
शेतीमधे उद्या जर पिकले अनाज नाही

गावे बकाल आणिक, शहरे सुजून आली
आम्हांस मात्र त्याची, अजिबात लाज नाही

शालेय पुस्तकांनी, मेंदू बधीर केला
बुद्धी भ्रमिष्टतेवर, उरला इलाज नाही

स्वातंत्र्य देवते तू, ये भारतात थोड़ी
जेथे 'अभय' कुणाला, कुठलेच आज़ नाही






बोलण्यापुरतेच होते बोलण्याचे
बोलण्यापुरतेच होते बोलण्याचे 
पाहिले तू फक्त येथे फायद्याचे

झोपडी माझी तुझी उध्वस्त केली 
काय मी सांगू अजून या कायद्याचे

पहिली नाही कधीही पूर्ण भाकर
स्वप्न बघतो तो मिठाई आणण्याचे

मोकळे होऊन जावू आज आपण
शेवटी बोलून झाले बोलण्याचे

मी तसा स्वप्नात होतो नेहमी पण,
आसवांने काम केले जागण्याचे




ताळा....
कितीवेळा केला तरी ताळा जुळतच नाही
सुख वजा दु:ख वजा काही कळतच नाही

वेच वेचूनिया गारा खिश्यामध्ये फक्त पाणी
थंडगार हातपाय आशा मिटतच नाही

सोसाट्याचा वारा मनी धपापल्या उरी कुणी
झिंगण्याची धुंदी पण कुणा कळतच नाही

मोजायचे ठरवुनी मोजमाप होत नाही
सरलेले देणे घेणे पक्षा घरटेच नाही

पायाखाली जरी काटे चालायचे आहे पुढे
वेदनांचा डोह मनी सामोरी वाटच नाही 

तहानल्या कंठी क्षोभ उभा जरी मेघाखाली
ओघळले नच पाणी छाया भेटलीच नाही

कोसळेल प्रेत कधी खेदासी कारण नाही  
मेलेलेच होते आधी रडण्या कुणीच नाही




नाटक वाटू नये
थुंकली थुंकी पुन्हा पुन्हा, उगीच चाटू नये
नाटक सुद्धा असेच वठव की, नाटक वाटू नये

लाख उमटू दे देहावरती, आपुलकीची चरे
पण इवलेसे काळीज माझे, तितुके फाटू नये

नकोस दाखवू दिव्य धबधबे, अत्तरवर्णी झरे
मी मागत नाही फार परंतु; पाझर आटू नये

वरून सांत्वन, आतून चिमटा; नाद तुझा वेगळा
जाणीव इतकी तरी असू दे, मैतर बाटू नये

सपाट टक्कल चमचमी माझे, लोभसवाणे जरी
संधी मिळाली म्हणून त्यावर, पोळी लाटू नये

पिकल्या फळांनी लदबदलेले, रान जरी मोकळे
हवे तेवढे भरपूर खावे, फुटवे छाटू नये

सगे-सोबती गाळून घे तू, 'अभय' घप्प मनाने
बिनकाम्यांची अवतीभावती, गर्दी दाटू नये





राजकारण
प्रत्येक माणसाच्या जगण्यात राजकारण
बहुतेक या हवेच्या रक्तात राजकारण

कळले मला न केंव्हा मज रोग लागला हा
ती बोलता समजले माझ्यात राजकारण

सोबत हवी तयांना माझी पदोपदी क?
त्यांच्या कुशीत माझे असण्यात राजकारण

नुसते जगावयाला साधे सरळ असावे,
इच्छे नुसार जगण्या हातात राजकारण

माझी महाग भाजी विकली कधी न गेली
नेता विकून आला स्वस्तात राजकारण



काय मी असलो तरी अन काय मी नसलो तरी
सस्थ का बसणार आहे काळ ,मी बसलो तरी
काय मी असलो तरी अन काय मी नसलो तरी

ह्या तुझ्या न्यायीपणावर हासतिल सारे उद्या
की मला होतेय फाशी फक्त खसखसलो तरी

कोण तू आहेस माझी कोण मी आहे तुझा
भेट का घेशील माझी मी तुला दिसलो तरी

व्हायचे असतेच असते ते कसे टाळायचे
दुःख का संपेल माझे खूप फसफसलो तरी

ओल काठांना म्हणे आतून यावी लागते
तू कुठे भिजशील मी बेधुंद पावसलो तरी

वीट म्हणजे आपले मन हे मला वाटायचे
मी उभा ठाकू न शकलो पण चला ठसलो तरी





मोजतांना
मोजतांना
मोजतांना हेच चुकले
मी तिला माझ्यात धरले
आरसा आक्षेप घेतो
मी मला जर ‘छान’ म्हटले !
देत गेली ती मला पण
फक्त त्याला 'दान' म्हटले
पुण्य होते कनवटीला
पण कुठे वाटेत पडले
जाण आली पण उशीरा
तोवरी जगणेच सरले
वागलो मी का असा का?
तूच तर भाळी लिहिले





चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला
चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला
"चांगला असणे"च ह्याचा दोष "त्या"ला घावला ..

आज पटली त्या यमाला फार माझी थोरवी
श्वासही माझाच तो का पळवण्याला धावला ..

एक सदरा मी सुखाचा माणसाचा घातला
फाडण्याचा घाट त्यांचा का अती सोकावला ..

हाय ना मी फेडला पहिला नवस त्याचा कधी
क्षण सुखाचा मज मिळेना देवही रागावला

लेउनीया साज आली कामिनी थाटात ती
तेज बघुनी कामिनीचे साजही भारावला ..


अवतरणात "त्याचे" नसणे अधोरेखित होत गेले
भेटल्या सार्याच लोकांना आपले समजत  गेले.
केवढे  खोट्याच नात्याचे पाश सांभाळत गेले.

ऐकले होते उगा मी जे बोलले नव्हतास तू.
खोटे सारेच भास तरी आज पुन्हा गुंतत गेले.

जेव्हा सुखाच्या वाक्यास दु:ख पुर्णविरामी यावे.
अवतरणात  "त्याचे" नसणे अधोरेखित होत गेले.

ज्या मनास सोस होता बेबंध वेडे धावण्याचा.
तयाचे धादांत खोटे अंदाज  अजमावत गेले.

कितीदा वेडीच ठरले  स्वप्नाळू आहे म्हणून .
हसता हसताही दु:खाचे चार अश्रू झाकत गेले .

थांबणे आता जमेना प्रवाहाचा पूर झाला .
शेवटी तुझ्या आठवांत नवी आशा जोडत गेले.



नि:शब्द हो, कविते
सांगून झाले खूप, तू नि:शब्द हो, कविते
मौनात बाकी पोचवू, नि:शब्द हो, कविते

केलीस तितकी खूप आहे वाट दु:खांना
वाहून जाऊ देत पू, नि:शब्द हो, कविते

हा अक्षरांचा गोफ केवळ कागदी आहे
ना गंध त्याला, ना मधू, नि:शब्द हो, कविते

होईल सवयीचा पलायनवाद श्रोत्यांना 
होईल शब्दांची अफू, नि:शब्द हो, कविते

बोलूनही काही बदलणे ज्यांस ना जमते
त्यांचे जगी होते हसू, नि:शब्द हो, कविते

सेवायला बागेत नाही 'भृंग' कोणीही
वाया नको ग मोहरू, नि:शब्द हो, कविते




सुरू झाली जुनी ती वेदना हृदयात घावाची
सुरू झाली जुनी ती वेदना हृदयात घावाची
पुन्हा मग रंगली चर्चा तुझ्या माझ्याच नावाची

तुझे बस नाव होण्याला पुन्हा मी हारलो मित्रा
तशी तर कल्पना होती तुझ्या प्रत्येक डावाची

म्हणे खूप धावते होते तिच्या शहरातले रस्ते
मला तर पायवाटीची सवय मझ्याच गावाची

तशी तर रोजची असते इथे दरवाढ ठरलेली
जरी ही कापणी होते बळीच्या रोज भावाची

उभे आयुष्य मी एका दिव्यावर काढले होते
जरी शेजार पाजारी दिवाळी रोज रावांची





लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
आता तयार व्हावे लढण्यास लेखणीने
रक्षण अबोलतेचे करण्यास लेखणीने

अभ्यास चिंतनाला शास्त्रात घोळवावे
कसदार शब्दशेती फुलण्यास लेखणीने

वास्तव चितारण्याची अवगत कला करावी
भक्कम नवीन पाया रचण्यास लेखणीने

नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे
आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीने

भाकड-वृथा कथांच्या कक्षेपल्याड जावे
अभिजात सृजनाला पुजण्यास लेखणीने

लटकी-पुचाट वाणी शिरजोर होत आहे
यावे रणात गच्ची धरण्यास लेखणीने

जेव्हा चहूदिशांनी वादळ विराट तेव्हा
द्यावे अभय दिव्याला जळण्यास लेखणीने





कोण स्वत:चा असतो? सारे गुलाम संबंधांचे
कोण स्वत:चा असतो? सारे गुलाम संबंधांचे
ब्रह्म स्वयंभू, बाकी येथे तमाम संबंधांचे

कूस सवाष्णेची, पण दिसते कपाळ वैधव्याचे
पोर निरागस असुनी ठरते हराम संबंधांचे

रोग दुराव्याचा दोघांच्या मनास जडला असता
दु:खद नात्यावर चोपडतात बाम संबंधांचे

लाभ सहज होतो ज्याचा ते सहज विसरले जाते
मोल करी ना कोणी हल्ली छदाम संबंधांचे

थेट अनादी कालापासून सामने चुरशीचे
स्त्री-पुरुषांच्या मेळाचे, साम-दाम संबंधांचे

यौवन येता वात्सल्याचे, जरेत मग गात्रांचे
'भृंग', जगी चुकले कोणाला विराम संबंधांचे?




मनाप्रमाणे कधी तरी मी जगू नये का?
मनाप्रमाणे कधी तरी मी जगू नये का?
स्पृहा मलाही फुलावयाची असू नये का? 

जगात नाही, घरात नाही, मिठीत नाही
कुठेच वेड्या मनास थारा असू नये का?

फुटून जाईल ऊर कोंडून ठेवल्याने
किमान डोळ्यांतुनी जखम भळभळू नये का? 

फिकट तरी जागतेपणी लावतेच कुंकू
निदान स्वप्नी सशक्त मळवट भरू नये का?            

असेल वर्षा ऋतू घरातील कोरडा जर
तहानलेल्या वसुंधरेने भिजू नये का?

उगाच निर्माल्य फत्तरावर कशास व्हावे?
सजीव आलिंगनी फुलाने फळू नये का?   

किती करावे उपास-तापास मृण्मयीने?
अपूर्णतेला नियोग देखिल घडू नये का?



कोळिष्टके
चिंता
........................................

जीव कोठेच रमतही नाही
पाय येथून निघतही नाही

खूप काही करायचे आहे...
मात्र काहीच सुचतही नाही

तो तसा नम्रही बऱयापैकी
तो कुणालाच बधतही नाही

वेगळी वाट शोधतो आहे...
जागचा मीच उठतही नाही !

काय होईल, रोज ही चिंता...
काय होईल, कळतही नाही




माझ्या लक्षातच नाही
हा माल सुखाचा माझा का विकला जातच नाही
काय आज ह्या बाजारी कोणी दुःखातच नाही

नशिबाला पालटण्याचे केवढे यत्न केले पण
होणार कसे सांगा जर त्याच्या नशिबातच नाही

मी इथे जन्म घेण्याला झालीत कितीतर वर्षे
हे दुःख साजरे करणे माझ्या लक्षातच नाही

का नको त्यातिथे टाके घालत आहे हा शिंपी
आंधळाच आहे हा की काही पाहातच नाही

गावातिल सगळ्या शाळा आहेत मुलींच्या शाळा
हे पाहुन माझा मुलगा शाळेला जातच नाही

नेणिवबिंदूंतुन काही त्रिज्या खेचूया म्हटले
पण ह्या अमोघ परिघाला बहुधा संपातच नाही



रोजचे झाले
चांदण्याचे हे इशारे रोजचे झाले
आणि मेघांचे पहारे रोजचे झाले!
भेटले वाटेत, वा दारी, घरी आले
दुःख या ना त्या प्रकारे रोजचे झाले
सतत वरवर शांत दिसणाऱ्याच आकाशी
वादळांचे येरझारे रोजचे झाले!....
नेहमी हळुवार तो स्पर्शून जातो, पण-
गार वाऱ्याचे शहारे रोजचे झाले...
वेगळी भासे जगाला का कथा माझी?
विषय, घटना, पात्र - सारे रोजचे झाले!



तरही गझल
आठवांना आठवत मी जागणे आता नको
("हे असे आभासवाणे चांदणे आता नको")

मी तुझ्या प्रेमात वैरी कैकदा केले मला
येवढे माझे स्वताः शी भांडणे आता नको

तू कितीदा तोडला आहे भरवसा आमचा
ईश्वरा खोटे दिलासे मागणे आता नको

मी सुखाची वाट माझ्या जीवनी पाहू किती
यातना दारातली नाकारणे आता नको

केवढे धुत्कारले अन टाळले त्यांनी मला
वाटते  माझे मला कवटाळणे आता नको




मरणे माझे निश्चित होते
मरणे माझे निश्चित होते तव हृदयाच्या ठोक्यावर
आयुष्याला जाळत बसलो तुझ्या नेमक्या धोक्यावर

क्षणाक्षणाला शोधत असतो कारण माझ्या असण्याचे
मी म्हणजे मी कोण असावा भार राहतो डोक्यावर

कधी संपली भीती सांगना जन्मानंतर मृत्योची
माणुस कसरत करत राहतो आयुष्याच्या झोक्यावर

सत्याचे अन न्यायाचे ऐक अतुट नाते असते का?
अन्यायाला न्याय मिळाला फक्त जराश्या खोट्यावर



अबोल
प्रार्थनेस काय ढोल पाहिजे
पोचला नभात बोल पाहिजे

चेहऱ्यावरील दु:ख मोजण्या
घाव काळजात खोल पाहिजे

धाय मोकलीत आसवे नको
फक्त पापणीत ओल पाहिजे

दोर काचतोय जीवना तुझा
सावरावयास तोल पाहिजे

बोल कागदावरी हवा तसा
एरवी कवी अबोल पाहिजे





सुखाचा केवढा झाला पसारा
सुखाचा केवढा झाला पसारा
बिलगला वेदनेचाही पहारा
तुझ्या लाटेत सामावून घे ना
कधीचा थांबला आहे किनारा
तुझ्या वाणीत सारे भाव होते
नको सांगूस की केला पुकारा
तुझा रस्ता कधी चुकलो नसे मी
नसे ही बातमी आहे इशारा
किती चेकाळली स्वप्ने उराशी
पहा मिळताच थोडासा उबारा
अजुन तुडवीत आहे पाय काटे
अजुन नक्की नसे माझा निवारा
शरीराची उडाली फार थरथर
मनामध्ये कुठे होता शहारा?
मला सांगून गेला आपलेपण
तुझा तो एक ओळीचा उतारा
दुरुन नुसतेच तू नाचू नको ना
इरेला पेटला आहे पिसारा
जगाला पाहिजे ते ते म्हणू दे
'अजय' बिनधास्त वाजव तू नगारा





...चुकले असावे
वागणे चुकले असावे
बोलणे चुकले असावे
पोचलो येथे कसा मी?
चालणे चुकले असावे
आज कां होकार आला?
मागणे चुकले असावे
"अंतरे मिटलीच सारी"
मानणे चुकले असावे
ती सदिच्छा भेट होती!
गुंतणे चुकले असावे
गाव माझाही उजळला?
चांदणे चुकले असावे!
तो म्हणे सर्वत्र आहे
शोधणे चुकले असावे




एकदा
एकदा रानात वारे गंधगाणी गायचे
ऐकताना शेत माझे नेहमी डोलायचे

वासरू तान्ह्या उन्हाचे उंबऱ्याशी हुंदडे
सांजवेळी सावल्यांचे प्राण गोरज व्हायचे

जोंधळ्याचे टच्च दाणे कापसाची शुभ्रता
चांदणे माझ्या मळ्याला आणखी सजवायचे

लेक जाता सासरी ये चावडीला हुंदका
पालखी येता तुक्याची गाव रिंगण व्हायचे

आटली माया अशी की मेघही बरसू नये
जाणले तेव्हा नदीने कोरडे वागायचे

प्यायला पाणी मिळे पण प्रश्न छळतो रोज हा
लेकराला द्यायचे की वासराला द्यायचे

अंगणी येता कुणीही पोटभर जेवायची
भागवाया भूक आता छावणीवर जायचे

ठार मेलेल्या मनाने जिंदगी जगवायला
हे जिवाचे घेउनी कोठे कलेवर जायचे


जळणार आहे
शेवटी जळणार आहे
मी कुठे पळणार आहे?
मानतेही शुभ्र काया
मी कुठे मळणार आहे?
ही अशी चाळून पाने
मी कसा कळणार आहे?
विसरलो बहुतेक साऱ्या
एक पण छळणार आहे
जीवना,निर्देश दे ना
तू कुठे वळणार आहे?
श्वान सारे वाट बघती
आंधळे दळणार आहे
योजना गाभण कधीच्या
कोणती फळणार आहे?



झुकती नजर
घातक तिची झुकती नजर
बदमाष तो उडता पदर
रागावल्या साऱ्या कळ्या
मागे तिच्या सारे भ्रमर
ती माळते तो मोगरा
वाऱ्यासवे देतो खबर
जाणार असते ती तिथे
आधीच मी होतो हजर
का दूर इतके घर तिचे?
बदलेन म्हणतो मीच घर
ती थांबते अन हासते
मग दिवसभर मी वेडसर
ती भेटली ना भेटली
मी गझल लिहतो रात्रभर



मढे मोजण्याला
लपेटून फासामधी कायद्याला
ससे वाकुल्या दावती पारध्याला

नको पाडसा आज कळपास सोडू
चुल्ह़ा तप्त टपला तुला रांधण्याला

जवानीत होता उतावीळ श्रावण
अता फ़ागही ना विचारीत त्याला

तुझी आत्मग्लानी वृथा-व्यर्थ आहे
कुणी येत नाही मढे मोजण्याला

करा की नका काम कोणी पुसेना
बिले चोख ठेवा; लुटा आंधळ्याला

इथे देवळाच्या चिखल भोवताली
स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला



वनवास खास झाला
हलका सुवास आला हलकाच भास झाला
दिसलीच ना कुठे तू अन रोज त्रास झाला

तू राहतेस माझ्या हृदयात सांग त्यांना
विश्वात शोधण्याचा वेडा प्रयास झाला

घेवून मी प्रियेला जेंव्हा निघून गेलो
सर्वा नको नकोसा वनवास खास झाला

मी वागलो असा की उरला कुणी न वैरी
चंद्रास भाळलो अन सुर्यास फास झाला

मी एकटाच लढलो ना हारलो कधीही
दाही दिशात तुमच्या माझा निवास झाला




दुःख माझे
मी सांगू कसे कुणाला दुःख माझे
सोन्याहुनी पिवळे पिवळे दुःख माझे

काळवंडलो खुप या वेदनांनी आता
तरीही गुलाबी गुलाबी दुःख माहे

सांधू कुठवर आता आभाळ फाटलेले
मातीतून रुजते हिरवे हिरवे दुःख माझे

सुखासाठी लपेटू किती अंधाराला आता
पेटतेच सकाळी सकाळी दुःख माझे

घेत घेत आधार, आधार कुणाचा झालो
ती पारंबी पारंबीच आता दुःख माझे

स्मरते कधी कधी मला माझीच बोबड बोली
झुरते तेव्हा लडिवाळ लडिवाळ दुःख माझे




वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये
वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये

एवढ्यासाठीच जोपासतात, 'ते' येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये

कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये

जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?

कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर
की उंदीरही ज्ञानपीठाचे, पीठ खाऊ नये?

तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही
आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये

बाकी सर्व विसर 'अभय' पण एक, लक्षात ठेव तू
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये


फकीर
श्वास जेंव्हा फकीर झाला रे
प्राण तेंव्हा अमीर झाला रे
फार जवळून उत्तरे गेली
प्रश्न अजुनी अधीर झाला रे
सरळ चालून मात देणारा
सांग कुठला वजीर झाला रे?
मन तिचे जिंकणे न गरजेचे
ध्यास आता शरीर झाला रे!
हात सुटतात शेवटी सारे
समजले,पण उशीर झाला रे
पिंजले मी मला, पुन्हा विणले
जीव तेंव्हा कबीर झाला रे




अस्थी कृषीवलांच्या
पाया रचून गेले कर्तव्य जागणारे
होते तसेच आहे नुसतेच बोलणारे

होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे
जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे

माजून तर्र काही दिसतात कर्मचारी
प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे

देणार साथ काया नाही मनाप्रमाणे
उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे

रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी
संगे हवे कशाला वाटेत धापणारे?

धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे

अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला
करतात आत्महत्त्या का देश पोसणारे?

मस्तीत चालतो मी तुडवीत कूप-काट्या
करतील आमरस्ता मागून चालणारे

देतो 'अभय' कशाला भगवंत या पिलांना
शेतीस काळ ठरती, शेतीत जन्मणारे




मी ऐकले
मी ऐकले मनाचे
केले परी जनाचे
आजन्म वाद झाले
माझे नि जीवनाचे
नुसतेच पाहिले मी
साठे दुज्या धनाचे
आजन्म वाद झाले
माझे नि जीवनाचे
आत्म्यास आवरेना
वारू खुळे तनाचे
लक्षण बरे दिसेना
माझे नि या सनाचे


आठवाया लागले विसरून जाणे
रोजचे मज पाहुनी हासून जाणे
अन तुझ्या ओठात मी हरवून जाणे

फोन तू करणार नाही बोलल्यावर
तेच पुन्हा फोनवर बोलून जाणे

मी तुला विसरून गेलो काल जेंव्हा
आठवाया लागले विसरून जाणे

नेहमी मुठ्ठीत मी धरणे सुखाला
नेहमी त्याचे तसे निसटून जाणे

वागणे माझे असे मी ठेवलेले
आत मी रडलो तरी हसवून जाणे
या पुढे न भेटणे हे सांगण्याला
रोजचे माझे तुझे भेटून जाणे




व्यसनाधीन..!
तू गरज होतीस आणि हवीसही होतीस,
ती, असली तर ठीक, नसलीच तर उत्तम!!

२-३ कॅलेंडरं बदलली, फ्लॅटच छत वॉटरप्रुफींगला आलं.
पाळणा आला, दवाखाना आला, औषधं आली;
आता तू आणि ती, दोघीही गरजेच्या सदरात..
असायलाच हवीत अशी दोन श्रद्धास्थाने....!
तू लसूण तळून देतेस म्हणून.
आणि
ती इथून दूर नेते म्हणून.

"हम दो, हमारा एकच! "
(नशीब! )
एवढ्यावर थांबलो पुढे,
शाळा, ऍडमिशनं, दप्तरं,
इत्यादी. इत्यादी. इत्यादी.
आता ती गरज, आणि तूही असलीस तर उत्तमच!
"तळलेल्या लसणापेक्षा क्षणभराची शांतता प्रीफर करायला लागलोय आता मी."

आदळा-आपट, कुरबुरी, कटकटी, आवेग, आक्रोश
भांड्याला-भांडं, शब्दाला-शब्द.
पॅरललीच या सगळ्याच्या,
कॉलेजं, डोनेशनं, प्रगती अधोगती..
काहीच हातात नसलेल्या या गोष्टी.
आता ती हवीच, आणि तू नसलीस तर उत्तमच!
"नकोच तिज्या-आयला रोजचे ते नाटक!! "
.
.
.
.
.
.
आता कोणीच नाही.

आता कोणीच नाही, फक्त ती, ती आणि तीच!
देहाला सुधा तिचाच दर्प.
आणि स्वप्नांना मात्र तुझा.
तान्हुल्या जीवाचे हसणेही आठवते ना अधून-मधून,
ते पण ते ही तीच्याच नशेत.
तुझ्या नशेचा जीव घेतला ना मी...
कधीच.
तिच्याच नशेत अथांग बुडालेलो होतो ना...
तेव्हा.


एवढे नसते जलद आयुष्य सरण्यासारखे
एवढे नसते जलद आयुष्य सरण्यासारखे!
हाय, गेले लोक जे नव्हतेच मरण्यासारखे!!

शेवटाचा श्वास घेताना कळाले हे मला.........
खूप काही शक्य आयुष्यात करण्यासारखे!

याचसाठी मी हवाली जाहलो लाटांचिया......
अन् तसेही हे न गलबत फार तरण्यासारखे!

हे गमक माझ्या यशाचे फक्त शिखरे जाणती.........
पाय माझे पांगळे पण, ते न हरण्यासारखे!

वाळवंटातील यात्रेने मला समजावले.........
की, असे मृगजळ पखालीतून भरण्यासारखे!

कोण जाणे, माळरानावर कशी जमली गुरे?
या इथे ना राहिले काहीच चरण्यासारखे!

पावलांचे तू असे उमटव ठसे रस्त्यात की,
हर तुझे पाऊल वाटू देत ठरण्यासारखे!

शेर शब्दांच्या पलीकडचाच लिहिणे हे जणू.........
कवडशाला चक्क या हातात धरण्यासारखे!




दुष्काळ, भूक, तृष्णा....प्रश्नावलीप्रमाणे!
दुष्काळ, भूक, तृष्णा....प्रश्नावलीप्रमाणे!
वाट्यास जन्म आला विझल्या चुलीप्रमाणे!!

साठीतही उधाणे शैशव अजून माझे........
जपले उरात शैशव मी बाहुलीप्रमाणे!

आयुष्य की, म्हणावे हा ग्रीष्म बारमाही?
आभास गारव्याचा पण, सावलीप्रमाणे!

स्वप्नात रोज येते तारुण्य सांडलेले.........
दुरुनी मला पहाते ते वाकुलीप्रमाणे!

प्रत्येक पोर मजला वाटे मुलाप्रमाणे.........
प्रत्येक माय वाटे मजला मुलीप्रमाणे!

पंगत अरे, कशाची? झुंबड जणू भुकेची!
वाटे हरेक जेवण मज दंगलीप्रमाणे!!

मी एकटाच तेथे कमळासमान होतो!
होता जमाव भवती तो दलदलीप्रमाणे!!




मी कापसाप्रमाणे झालो सुमार हल्ली!
मी कापसाप्रमाणे झालो सुमार हल्ली!
का वाटतो भुईला माझाच भार हल्ली?

मी आजकाल देतो आहे मलाच खांदा........
लावीत कोण नाही मज हातभार हल्ली!

होतात दोस्त कोणी, होतात यार कोणी........
फसवायचे निघाले नाना प्रकार हल्ली!

नाकारल्याप्रमाणे होकार रोज येती........
मी मोजतो कुठे रे, माझे नकार हल्ली?

कातर असायची ती तिन्हिसांज आजवरती.........
मन कातरीत माझे बसते दुपार हल्ली!

केली कृपा फुलांनी, झालीत ती दयाळू.........
मज जाणवू न देता करती प्रहार हल्ली!

शहरे कशी म्हणावी? घनदाट जंगले ही......
रानातल्याप्रमाणे होते शिकार हल्ली!

इतके जगून झाले, डोळे मिटून जगतो........
माझे जिणेच झाले आहे जुगार हल्ली!

बांधू कसे कळेना मन दावणीस माझे..........
येती मनामधे या भलते विचार हल्ली!

तारा कुणीच नाही छेडीत काळजाच्या!
टाचून ओठ बसते माझी सतार हल्ली!



पाहतात का मलाच....
पाहतात का मलाच....
पाहतात का मलाच वापरून माणसे?
टाकती मलाच दूर ठोकरून माणसे!

निसरडेपणा बघून जाहली सुजाण ती........
आजकाल चालतात सावरून माणसे!

ये अता, अजून अंत पाहशील तू किती?
बैसलीत काळजास अंथरून माणसे!

काय त्या सजावटीस मीच योग्य वाटलो?
टाकती मलाच चक्क कातरून माणसे!

लागले जसे जसे कळायला मला तसे.......
पाहती मला दुरून घाबरून माणसे!





पहा नाठाळ चालवती कशी लाठी, तुकारामा!
पहा नाठाळ चालवती कशी लाठी, तुकारामा!
सरळ होतील ते, हाणा तुम्ही काठी, तुकारामा!!

पशूवत माणसांना माणसे बनवायचे आहे.......
असू द्या आज गाथा आमच्या गाठी, तुकारामा!

पहा ही झुंडशाही, दांडगाई अन् अनागोंदी........
पुन्हा या एकदा अमुच्या भल्यासाठी, तुकारामा!

कशी लोकांस शिकवावी अता ज्ञानेश्वरी, गाथा?
करंट्यांच्या कपाळावर, पहा आठी, तुकारामा!

मनस्वी, स्वैर सुटलेले किती मोकाट हे नेते........
करावी गय उनाडांची कशासाठी, तुकारामा?

उतारू या समाजाच्या गळी गाथा, तुकारामा......
असू द्या हात तुमचा आमुच्या पाठी, तुकारामा!

पहा बाजार वाळूचा, भुईचा पोचला गगनी.........
पहा उद्योग लोकांचे नदीकाठी, तुकारामा!




रणधुमाळी तीच अन् त्याच आरोळ्या पुन्हा
रणधुमाळी तीच अन् त्याच आरोळ्या पुन्हा
ठाकल्या समरांगणी लुटुपुटू टोळ्या पुन्हा

लाख लाखोल्या जरी एकमेका वाहिल्या
गाठण्या सत्ताशिखर बांधती मोळ्या पुन्हा

धूळ ज्यांची मस्तकी धारली ते मातले
घालवत नाही, मना, स्वप्नरांगोळ्या पुन्हा

राजकारण खेळ हा कुंटणींचा चालला
पुनरपी ढळले पदर, उतरल्या चोळ्या पुन्हा

मोठमोठे मार्ग पण वाटमारी टोलची
रे खिशा, वाटा बर्या त्याच चिंचोळ्या पुन्हा

दीन-दुबळे गांजले; आग पोटी पेटली
भाजती नेते, पहा, त्यावरी पोळ्या पुन्हा

नेहमी आश्वासनी अडकतो अलगद अम्ही
आपला देती बळी मक्षिका कोळ्या पुन्हा

कैफ धर्माचा नुरे, ना निधर्माची नशा
ह्यापुढे आणू नका त्या अफूगोळ्या पुन्हा

पाच वर्षे पोटभर खूप लोणी लाटले
जोगव्यासाठी पुढे, 'भृंग', का झोळ्या पुन्हा?



पहा प्राण गेला पहाडाप्रमाणे........
पहा प्राण गेला पहाडाप्रमाणे........
अता लोक जमले गिधाडाप्रमाणे!

कधी बंद करतो, कधीही उघडतो.......
मला रोज वारा कवाडाप्रमाणे!

बटांशी तिच्या खेळतो सारखा तो........
लडीवाळ वारा लबाडाप्रमाणे!

जसे नेटवर मी लिहू लागलेलो........
जगाला मिळालो घबाडाप्रमाणे!

लटांबर बरोबर सदा घेउनी मी.......
खुराडे बदलतो बिऱ्हाडाप्रमाणे!

सदा पाठमोरेच ते वार करती.......
सदा वागती लोक भ्याडाप्रमाणे!

मुले दूर गेलीत पक्षांप्रमाणे.........
उभा आज मी खिन्न झाडाप्रमाणे!

रसास्वाद माझाच ते घेत होते......
मला पाहती ते चिपाडाप्रमाणे!



अतीशाहणे अन् शहाणे किती?
अतीशाहणे अन् शहाणे किती?
खरे शाहणे कोण जाणे किती?

मला मूर्ख वेड्यात काढायला......
शहाण्यांकडे हे बहाणे किती!

मला हिंट काही तरी दे सखे.......
मला घालशी हे उखाणे किती!

तिन्हीकाळ गझलेमधे डुंबतो........
असे ठार वेडे, दिवाणे किती?

किती बार, गुत्ते, नि अड्डे किती!
पिण्याची तुझ्या रे, ठिकाणे किती!!

अताशाच खातोय मिष्टान्न मी.......
अरे, खायचे मी फुटाणे किती?

घरंदाज कोणीच ना वाटले.......
अरे, पाहिली मी घराणे किती!

2 comments:

  1. व्वा. क्या बात है.
    च्यायला हि तर काव्याची उचलेगिरी नसून काव्य डकैतीच आहे.
    निदान कवितेच्या खाली कवीचे नाव तरी घालायला नको होते का?

    ReplyDelete
  2. या गझला ज्यांच्या आहेत त्यांना विचारून चिटवायला हव्या होत्या... तुम्ही या ठिकाणी कॉपी पेस्ट केल्यात तर विचारायचं सोडा साधं गझलकाराच नाव तरी त्याखाली लिहायला हवे होते ना..!

    ReplyDelete