नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Friday 29 December 2017

जगावं की मरावं

To be or not to be, that is the question!!!
जगावं की मरावं
हा एकच सवाल आहे.
या दुनियेच्या उकिरड्यावर
खरकट्या पत्रावलीचा तुकडा होऊन
जगावं बेशरम लाचार आनंदानं
की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर
त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह
मृत्युच्या काळ्याशार डोहामध्ये?
आणि करावा सर्वांचा शेवट
एका प्रहाराने
माझा तुझा याचा आणि त्याचाही.
मृत्युच्या महासर्पाने
जीवनाला असा डंख मारावा
की नंतर येणाऱ्या निद्रेला
नसावा जागृतीचा किनारा
कधीही
पण त्या निद्रेलाही
पुन्हा स्वप्न पडू लागलं तर
तर-तर
इथचं मेख आहे.
नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात
प्रवेश करण्याचा धीर होत नाही
म्हणून आम्ही सहन करतो
हे जुने जागेपण
सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने
अभिमानावर होणारे बलात्कार
अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्त्वाची
विटंबना
आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन
उभे राहतो खालच्या मानेने
आमच्या मारेकऱ्याच्याच दाराशी.
विधात्या , तू इतका कठोर का झालास?
एका बाजूला , आम्ही ज्यांना जन्म दिला
ते आम्हाला विसरतात
आणि दुसऱ्या बाजूला , ज्यानं आम्हाला जन्म दिला
तो तूही आम्हाला विसरतोस,
मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन
हे करुणाकरा ,
आम्ही थेरड्यानी
कोण्याच्या पायावर डोकं आदळायच!
कोणाच्या - पायावर- कोणाच्या-
---------------------- नटसम्राट

No comments:

Post a Comment