नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Friday 29 December 2017

स्वातंत्र्यवीर सावरकर

 स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती
 वीर सावरकर मराठी कविता
 सावरकर विचार मराठी

"ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला," ह्या गीताचे शताब्दी पुरती वर्ष तसेच; हे गीत रचून महासागराला साकडे घालणाऱ्या महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांना मनाचा मुजरा. २८ मे १८८३ साली दामोदरपंत आणि राधाबाई या दाम्पत्याच्या  पोटी नाशिक जिल्ह्याच्या भूगुर गावी ची. विनायकचा ( आदरार्थी एकवचन) जन्म झाला. त्यांचे घराणे इनामदारांचे. घरी समृद्धी, म्हणजे ' देशभक्तीचे' फुकटचे श्राद्ध घेण्याची त्यांना अजिबात गरज नव्हती, पण देशभक्ती त्यांच्या नसानसांत भिनलेली होती. पारतंत्र्याची साल त्यांना शांत झोप देत नव्हती. ' मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' म्हणजे स्वातंत्र्यवीरांचे असामान्यत्व त्यांच्या बालवयात दिसून आले. त्यांची बुद्धी शीघ्र व तल्लख, आकलनशक्ती जबरदस्त. ९/१० वर्षाचे असताना ते वृत्तपत्रीय वार्तांवर मित्र मंडळीत चर्चा करीत. लहानपणी त्यांची आई वारली. त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न न करता त्यांचे मातेच्या वात्सल्याने  संगोपन केले. १८९७ साली वयाच्या १४ व्या वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी ते नाशिकला आले. तेथील गणेश उत्सवातून त्यांनी देशभक्तीच्या चळवळीस प्रारंभ केला. त्याच साली चाफेकर बंधूना Rand  ह्या गोऱ्या साहेबाच्या हत्येबद्दल फाशीची शिक्षा झाली. सावरकरांच्या मनात देशभक्तीचा अंगार फुलविण्यास हि गोष्ट विशेषत्वाने कारणीभूत ठरली. या प्रसंगानातर वयाच्या १५ व्या वर्षी कुलस्वामिनी पुढे ' सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने भारतमातेला स्वतंत्र' करण्याची शपथ घेतली आणि १८९९ साली ' राष्ट्रभक्त समूह' आणि 'मित्रमेळा' नावाच्या क्रांतिकारी गुप्त संघटना काढल्या, तसेच शिवजयंती, गणेश उत्सव आदी अनेक कार्यक्रम सुरु करून सावरकरांनी नाशिकचे समाजजीवन भारून टाकले.

 १९०४ साल हे वंग-भंग च्या चळवळीमुळे देशभर गाजले. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रा संतापून उठवला. त्यातूनच 'स्वदेशी' आणि 'बहिष्कार' या चळवळी उत्पन्न झाल्या. या चळवळीचा एक भाग म्हणून स्वातंत्र्यवीरांनी पुण्यामध्ये विलायती कपड्यांची ' सामुदाईक होळी' पेटविली. १९०६ साली लोकमान्य टिळकांचे साहाय्य घेऊन ते इंग्लंड ला गेले. तेथे ते श्यामजी कृष्णवर्मा यांच्या ' india house ' मध्ये उतरले. श्यामजी कृष्णवर्मा हे क्रांतिकारी विचारांचा पूरस्कार करणारे होते. त्या दृष्टीने  india house ' हे इंग्लंड ला उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थांचे वसतिगृह होते. कृष्णवर्मा यांनी तेथे स्वातंत्र्यवाद्यांची 'homerule'  नावाची एक संघटना काढली होती. थोड्याच काळात स्वा. सावरकर त्या संघटनेचे सूत्रधार बनले.  'homerule' च्या तरुणांना क्रांतीवादाची शिकवण देऊन स्वातंत्र्यवीरांनी त्यांना भारून टाकले. त्या काळी क्रांतीची प्रक्रिया सांगणारा ' Joseph Mazzini यांचे आत्मचरित्र व राजकारण' नावाचा लंडन मध्ये लिहिलेला सावरकरांचा ग्रंथ एव्हढा गाजला कि, सरकारला तो जप्त करावा लागला, पण त्यामुळे त्याचे महत्व आणखीनच वाढले.

 १९०७ साली १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाला ५० वर्षे पूर्ण झाली. ' शिपायाची भाऊगर्दी' आशा नावाने इंग्रज आणि त्यांच्या तालावर नाचणारे कातडीबचाऊ तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी- भारतीय विद्वान त्या स्वातंत्र्ययुद्धाला हिणवत होते. तो अपसमज दूर करण्यासाठी सावरकरांनी '१८५७ सालचे स्वातंत्र्यसमर' या नावाचे एक पुस्तक मराठीत लिहिले. एव्हढेच नव्हे तर लंडन मध्ये त्या स्वातंत्र्यसंग्रामाचा ५० व स्मृतीमहोत्सव मोठ्या थाटात साजरा केला. भारतात क्रांतीची चळवळ दडपून टाकण्यासाठी त्या काळात इंग्रज सरकारने अत्याचाराचे थैमान मांडले होते. राजद्रोहाच्या आरोपाखाली अनेक तरुणांना जन्मठेप व फाशीची शिक्षा ठोठावली जात होती.

सावरकरांचे सहकारी मदनलाल धिंग्रा यांना १७ ऑगस्ट १९०९ रोजी फाशी देण्यात आली. त्याचा साली सावरकरांचे वडील बंधू बाबाराव सावरकर यांना 'राजाविरुद्ध बंड करणे' या आरोपाखाली अटक होऊन जन्मठेप - काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली, तर लॉर्ड मिंटो याच्यावर बॉम्ब टाकल्याच्या कटात सामील असल्याच्या संशयावरून सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव यांना अटक झाली.

धिंग्रा प्रकरण थोडेसे शांत झाल्यावर स्वातंत्र्यवीरांनी प्रचारपत्रके, ग्रंथ, बॉम्ब बनविण्याची पत्रके व पिस्तुले भारतात पाठविण्याचा धडाका सुरु केला. भारतातील वातावरण सरकारी अत्याचारांनी तापले होते. आशा स्थितीत अनंत कान्हेरे यांना फाशीची शिक्षा झाली, पण ज्या पिस्तुलाने Jacson ची हत्या झाली ते पिस्तुल सावरकरांचे होते आस शोध लागताच ब्रिटीश सरकारने त्यांना अटक केली.

या खटल्यात त्यांना ' दोन जन्मठेपींची' म्हणजे ५० वर्षाच्या काळ्यापाण्याची शिक्षा झाली. हे भवितव्य स्वातंत्र्यवीरांना आधीच कळून चुकले होते. त्यामुळे त्यांनी ब्रिटनच्या तुरुंगातून बाहेरच्या क्रांतिकारक सहकारयाना ' शेवटचा रामराम' नावाचे अनावृत्त पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, " मित्रानो ईश्वराने आपल्यापैकी प्रत्येकाची भूमिका आधीच ठरवून टाकली आहे. ईश्वराने नेमून दिलेली भूमिका वटवताना प्रसंगी जळत्या खडकांना बांधून, कोंडून पडावे लागेल, तर प्रसंगी क्रांतीच्या उसळत्या लाटांच्या शिखरावर स्वार होता येईल. जगन्नियत्याने कोणत्याही परिस्थितीत ठेवले तरी ती परिस्थिती सर्वोच्च आहे, असे समजून आपले जीवित कार्य पार पाडावे." यावरून स्वातंत्र्यवीरांची दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रखर देशभक्ती, आशावाद, ईश्वरनिष्ठा व द्रष्ठेपणा आणि धीरोदात्त वृत्ती दिसून येते.

' पन्नास वर्षे' काळ्या पाण्याची सजा म्हणजे अंदामांहून जिवंत परत येणे नाही, असा ह्या शिक्षेचा अर्थ होता. त्यांना तिकडे नेण्याआधी त्यांची पत्नी साध्वी यमुनाबाई  त्यांना भेटण्यास जाणून शेवटचे दर्शन घेण्यास गेल्या, तेव्हा सावरकर त्यांना म्हणाले, ' भव्यतम अर्थाने आपणही संसार थाटण्यात यशस्वी ठरलो आहोत. आपली चार चूल - बोळकी आपण फोडून टाकली, पण  पुढे - मागे त्या योगे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघू शकेल.' स्वातंत्र्यवीरांचे हे शब्द, हि भविष्यवाणी आज तंतोतंत खरी ठरली आहे. त्यांनी ज्या मरणयातना भोगल्या, त्यामुळेच आपण आजचे स्वातंत्र्य उपभोगीत आहोत. स्वातंत्र्याचे मालक (राजकर्ते) बनलेल्या सत्ताधाऱ्यांच्या घरी खरोखरच सोन्याचा धूर निघत आहे, पण त्यासाठी सावरकर आणि स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या क्रांतीविरानी आपल्या सोन्यासारख्या संसाराची अक्षरश: होळी केली आहे. याची सतत जाणीव ठेवणे हीच त्या देश्भाक्ताना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

अंदमानच्या सिल्वर जेल मध्ये नरकयातना भोगत असताना 'कमले' सारखे नितांत सुंदर काव्य त्यांना स्फुरले. घायपात्याच्या काट्याने ते तुरुंगाच्या भिंतीवर काव्यचरण लिहून मुखोग्दत करीत. पुढे अंदमानात हि त्यांनी राजकैद्यांची एकी घडवून आणून राजकैद्याना काही सोयी सुधारणा मिळवून दिल्या. तिथले मुस्लीम कैदी हिंदू बांधवांना बाटवीत, तेही त्यांनी थांबवले. १९२४ च्या जानेवारीत सावरकरांची तुरुंगातून सशर्त मुक्तता करण्यात आली. त्यांना राजकीय काम करण्यास बंदी करण्यात आली, पण म्हणून ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी समाजसुधारणेचे कार्य हाती घेतले. पतितपावन मंदिर बांधून ते अस्पृश्यांसह सर्वाना खुले केले. आणि रत्नागिरीच्या सार्वजनिक जीवनातून अस्पृश्यता व रोटीबंदी या प्रथांचे उच्चाटन केले. त्यांच्याच प्रेरणेने गोमंतकमधल्या ख्रिस्ती गावाड्याचे शुद्धीकरण केले गेले.

 ' हिंदुत्व हे भारताचे राष्ट्रीयत्व ' असे ते मनात. ' हिंदू राष्ट्राचा कर्णधार ' या नात्याने सावरकरांनी स्वत:चा असा स्वतंत्र कार्यक्रम आखून भागानगर व भागलपूरचे दोन नि:शस्त्र प्रतिकाराचे लढे दिले. त्यात ते संपूर्ण यशस्वी झाले. त्यामुळे महात्मा गांधीनी खास तर पाठवून धन्यवाद दिले, मात्र असहकार आणि नि:शस्त्र चळवळीच्या मार्गाने भारताला स्वतंत्र मिळेल, यावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता, म्हणून भारतीय तरुणांनी सैनिकी शिक्षण घेऊन शस्त्रसज्ज असले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. त्यासाठी त्यांनी आपल्या ' हिंदू ' महासभेच्या वतीने सैनिकीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी भारतभर प्रचार केला सावरकरांचे सदभाग्य असे कि, त्यांना " याची देही याची डोळा" स्वातंत्र्य देवीचे दर्शन झाले. ( म्हणजे ते हयात असतानाच भारत स्वतंत्र झाला.)


 स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ देशभक्त नव्हते तर द्रष्टे समाजसुधारक हि होते. त्यांच्या ठाई अमोघ वकृत्व आणि महाकवीची प्रतिभा विलासात होती, तसेच आत्मचरित्रकार आणि नाटककार म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. भाषा व लिपी शुद्धी यांचे ते अभिमानी होते, तसेच ते हिंदुत्वाचे, हिंदू राष्ट्रवादाचे कडवे पूरस्कर्ते होते, मात्र चातुवर्ण, जातीभेद, कर्मकांडे आणि अस्पृश्यता  याला त्यांचा कडवा विरोध होता. या रूढी मुळे हिंदू धर्माचा नाश झाला. ' प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगक्षम, विज्ञानधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म' असे ते म्हणत. " दोन शब्दात, दोन संस्कृती" या आपल्या निबंधात त्यांनी रूढी - अंधश्रद्धांवर कठोर प्रहर केले आहेत. मी वृत्तीने कवी आणि कलावंत आहे, पण मला परिस्थितीने राजकारणी पुरुष बनवले, असे ते म्हणत. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी कवितेची धूळपाटी हातात घेतली आणि तेव्हापासून पुढे ४० वर्षे अव्याहतपणे त्यांनी काव्यलेखन केले. चळवळीच्या धकाधकीत आणि अंदमानातील यातनामय, उपेक्षित व एकाकी जीवनात त्यांना साथ केली ती कवितेने! जगण्याचे लढण्याचे बळ दिले ते कवितेने!

त्यांची एकषष्ठी, पंचाहत्तरी सर्व भारतीय जनतेने मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरी केली. त्याच वेळी या महापुरुषाच्या मनात आत्मसमर्पणाचे विचार येवू लागले. त्याप्रमाणे त्यांनी क्रमाक्रमाने औषधपाणी, अन्न आणि शेवटी पाणी घेणेही थांबवले. अखेरीस २६ फेबृवारी १९६६ रोजी त्यांनी जराजीर्ण देह काळाच्या स्वाधीन केला. वेगळ्या अर्थी मृत्युच्या माथी पाय देवून ते अशाश्वतातून  शाश्वतात विलीन झाले आणि एक धगधगते अग्निकुंड थंड झाले. विनायकराव सधन, सुसंस्कृत, उच्चविद्याविभूषित होते. त्यामळे गलेलठ्ठ पगाराची नोकरी, सुविधा, अधिकार त्यांना सहज मिळू शकला असतं. स्वातंत्र्यवीराऐवजी ते " रावसाहेब" झाले असते, पण ते होणे नव्हते म्हणून सर्व सुखे लाथाडून यातनामय जीवनाचे ' सतीचे वाण' त्यांनी मुद्दाम ( हेतूपूर्वक) घेतले. भारताच्या लाडक्या सुपुत्राला माझे - तुमचे लाख - लाख प्रणाम| जय हिंद , जय महाराष्ट्र |


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

वीर सावरकर मराठी कविता 


आत्मबल

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।
अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।
लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।

जयोस्त्तु ते 

जयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले। शिवास्पदे शुभदे्
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे ।।धृ।।
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति संपदांची
स्वतंत्रते भगवति। श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती। चांदणी चमचम लखलखशी।।
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती। तूच जी विलसतसे लाली
तूं सुर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंची
स्वतंत्रते भगवती। अन्यथा ग्रहण नष्ट तेंची ।।
मोक्ष मुक्ति ही तुझीच रुपें तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती। योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतंत्रते भगवती। सर्व तव सहचारी होते ।।
हे अधम रक्त रंजिते । सुजन-पुजिते । श्री स्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन
तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।
हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रिडा तेथे करण्याचा कां तुला वीट आला
होय आरसा अप्सरसांना सरसे करण्याला
सुधाधवल जान्हवीस्त्रोत तो कां गे त्वां त्यजिला ।।
स्वतंत्रते । ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला
कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीला
ही सकल-श्री-संयुता आमची माता भारती असतां
कां तुवां ढकलुनी दिधली
पूर्वीची ममता सरली
परक्यांची दासी झाली
जीव तळमळे, कां तूं त्यजिले ऊत्तर ह्याचें दे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।
 

हिंदु नृसिंह

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदु-सौभाग्य-भूतिच्या-साजा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
करि हिंदुराष्ट्र हे तूंते। वंदना
करि अंतःकरण तुज अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदना
गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।
हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा भग्न आज जयदु्र्गं आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांची । जंगलें
परदास्य-पराभविं सारीं । मंगलें
या जगतिं जगू हीं आज गमतसें लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुध्दि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुध्दि हेतुचि कर्मी । राहु दे
ती बुध्दि भाबडया जीवां । लाहु दे
ती शक्ती शोणितामाजी । वाहु दे
दे पुन्हा मंत्र तो दिलें समर्थे तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।


शत जन्म शोधिताना

शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥
तेंव्हा पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी ।
सुख साधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥
हा हाय जो न जाई । मिठी घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥

सागरास

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला


‘ने मजसी ने’ या सुप्रसिद्ध कवितेचे येथे दिलेले विवरण पुण्याचे स्वामी माधवानंद यांनी केले आहे :

घर मोडकळीला आल्याचा – दोघं भाऊ पकडले गेल्याचा – धक्का होताच. माणूस क्रांतिकारी म्हणून जन्माला येत नाही तो क्रांतीकारी बनतो. घरावर राष्ट्राच्या नावाने बेल तुळस वाहून हे लोक बाहेर पडले तरी प्रेम जिवंतच असतं ही माणसं सामान्य नव्हती. एवढया मोठया सत्तेशी ते थोडेच लोक झुंज घेत होते. अख्खा समाज तुमच्या बाजूने असला तरी तो तुमच्या बाजूने उभा राहत नाही. त्याला उभं करायचं आणि त्याचवेळेला एकाकी झुंजायचं असं अवघड काम ते करीत होते. कुटुंबाची वाताहत, कार्य उदध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपणं आणि स्वतः शंभर टक्के पकडले जाणार आहोत हे कळणं यातून अक्षरशः पळून जाऊन ते त्या ब्रायटनच्या किना-यावर बसले होते. पकडलो गेलो तर परत भारतात पाठवतीलच असं सांगता येत नाही हा अत्यंत अस्वस्थ करणारा विचार आणि समोर सागर. तो मध्ये आहे म्हणून जाऊ शकत नाही. या भावनेतून ते शब्द आले – ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ जणू काही ते त्यांचा सगळा भावनिक आघात सागरावर करीत आहेत – त्या सागरावर रागावलेला – रूसलेला हा मातृभूमीचा प्रियपुत्र म्हणतो – ‘सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस.
भूमातेच्या चरणतला तुज धूता ।
मी नित्य पाहिला होता

त्यावेळेला मी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास – मित्र मित्राला म्हणतो तसा – की चल जरा फिरायला जाऊ
दुस-या देशात-

मज वदलासी अन्य देशी चल जाऊ ।
सृष्टीची विविधता पाहू

त्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात माझा तिला विरह होईल की काय अशी शंका आली.

तअ जननी-ह्रद विरहशंकितहि झाले ।
परि तुवां वचन तिज दिधले

पण तू तिला वचन दिलंस, की मी मार्गज्ञ म्हणजे वाट माहित असणारा आहे, आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन – जहाज सागराच्या पृष्ठावरून म्हणजे पाठीवरूनच नेलं जातं. त्यानुसार

मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन।
त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी

तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. तू जगभर सगळीकडे आहेस त्यामुळे जगाचा तुला अनुभव असाणार हा विश्वास आणि मलाही जगाचा सुंदर अनुभव यावा ही इच्छा या दोन्हीच्या योगे मी ‘बनलो’ तयार झालो आणि ‘बनलो’ म्हणजे फसलो.

तव अधिक शक्त उदधरणी । मी

पाणी कोणत्याही वस्तुला उत् म्हणजे वर धारण करतं वर ढकलंत त्याला उदधरण (buoyancy) म्हणतात. त्यामुळे वस्तूचं वजन पाण्यात कमी वाटतं. हा उदधरण. शक्तिचा शास्त्रीय अर्थ आणि ‘उद् धार करणे’ याचा प्रचलित अर्थ दोन्हींनी – तुझ्या उद् धरण शक्तीवर जास्त विश्वासलो. इथं अडकवून चांगला उद् धार केलास बरं !
‘येईन त्वरे’ कथुन सोडिले तिजला ।
सागरा प्राण तळमळला ।।१।।

लवकर येईन असं सांगून तिला सोडलं. (भारताचा किनारा सोडला) पण आता ते जमेल की नाही कुणास ठाऊक म्हणून प्राण तळमळतो आहे.
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ।
ही फसगत झाली तैशी
पोपट पिंज-यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा तसा फसलो.

भू विरह कसा सतत साहू या पुढती ।
दशदिशा तमोमय होती

तमोमय म्हणजे अंधःकारमय – मार्ग दिसत नाही असं झालंय.

गुणसुमने मी वेचियली या भावे ।
की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद् धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा

मला काय आठवतं ? तर माझ्या देशातल्या आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. (इकडच्या मोठया गुलाबांना तो सुगंध नाही आणि इकडच्या माणसांना आमच्या कुटुंबातल्या माणसांप्रमाणे घरात ती आम्रवृक्षासारखी वत्सलता ही नाही. त्यांच्यावर पुढची पिढी नवलतांसारखी वाढते आणि तिच्या पुढच्या पिढीची फुलंही त्या वृक्षवेलींवर नांदतात. ही सुंदर कुटुंब वत्सलता – प्रेम इथे नाही.
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला ।
सागरा प्राण तळमळला ।। २ ।।
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी ।
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा ।
वनवास तिच्या जरि वनिंचा

राज्य तर नकोच आहे पण वनवास सुध्दा तिच्याच वनातला हवा आहे. तुरूंगात घातलं तरी भारतातल्या तुरूंगात यांनी घालावं पण एखादे वेळेस हे इथेच कुठेतरी डांबून ठेवतील, ते नको आहे.
भुलविणे व्यर्थ हे आता । रे
बहु जिवलग गमते चित्ता । रे
तुज सरित्पते, जी सरिता । रे

हे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती – इथलं काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते तशीच सागरालाही सरितेची ओढ असते. सागराला म्हणत आहेत –माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतामातेचा मला विरह घडवशील तर हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल अशी मी तुला शपथ घालतो. नद्या तुझ्याकडे आल्याच नाहीत तर – मग प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.
तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला ।। ३ ।।

यानंतर आता शेवटचं कडवं आहे त्यात सावरकरांची आर्त आहे ; पण ती दीनवाणी नाही तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला गलितगात्र सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे. सागराला सरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर ते सागराकडे पाहत आहेत तर त्याच्या लाटा तशाच उसळून फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्या प्रकारे तो निर्दय सागर हसतो आहे असं त्यांना वाटलं. वीर पुरूषाने आव्हान दिल्यावर खलपुरूष असेच हसतात. असं वाटून ते म्हणतात-
या फेन-मिषे हससि निर्दया कैसा ।
का वचन भंगिसी ऐसा ?

माझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस, की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा ? हे गुलाम असतात ना, ते ज्यावेळेला मालकाच्या ताब्यात असतात तेव्हा आपण सुरक्षित आहोत म्हणून जगाकडे पाहून ते हसतात; पण ते गुलामीवृत्तीचं हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणा-या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणा-या सागरा,
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते ।
भिउनि का आंग्लभूमी ते ?
मन्मातेला अबल म्हणुनि फसविसी ।
मज विवासना ते देशी

विजनवास विदेशवास किंवा विवास – तू मला देतो आहेस पण अरे, आंग्लभूमीला भिणा-या भित्र्या खलपुरूषा, ऐक –
तरि आंम्लभूमी भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे

माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल. पूर्वीचा अगस्ति ऋषीचा प्रसंग तू विसरला आहेस.
कथिल हे अगस्तिस आता । रे

आमच्यातला एक अगस्ति पू्र्वी तुझ्यावर क्रुध्द होऊन एकाच आचमनात तुझं सगळं पाणी पिऊन बसला. तुझी कुठे नाव निशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्याने तुला सोडलं. एवढा रूबाब काय करतोयस गुलामा, अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू.
मातृभूमीला दुरावलेला आणि कायमचा दुरावला जाईल अशी शक्यता असलेला एक वीर पुरूष सागरावर रूसलेला आहे. वेदनेतून निर्माण झालेल्या ह्या अप्रतिम काव्यातून महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट झालाय. युवा केंद्राचं आगळेपण हे आहे की सागरावरचं हे तुफानी काव्य गात आहे सागरच !
 

सावरकर विचार मराठी


No comments:

Post a Comment